अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । हिंदू संस्कृतीतील पवित्र आणि मंगलमय परंपरेचे जतन करत अमळनेर येथील श्री मंगळग्रह मंदिरात कार्तिकी पौर्णिमेनिमित्त भगवान श्री विष्णूजी आणि श्री लक्ष्मी मातेचा प्रतिकात्मक विवाह सोहळा मोठ्या भक्तिभावात पार पडला. श्री तुळशी विवाह सोहळ्यानिमित्त आयोजित या धार्मिक कार्यक्रमाचे यंदा १५ वे वर्ष होते. मंगळवार, दि. २४ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजून १५ मिनिटांच्या शुभ मुहूर्तावर वैदिक मंत्रोच्चार आणि मंगलाष्टकांच्या गजरात विवाह सोहळा संपन्न झाला. हजारो भाविकांनी या अनोख्या दैवी विवाह सोहळ्याची ‘याची देही याची डोळा’ अनुभूती घेतली.
हिंदू संस्कृतीत श्री तुळशी विवाहाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तुळशी विवाहानंतर विवाहेच्छुकांच्या आयुष्यातील विवाह सोहळ्यांना प्रारंभ होतो, अशी धार्मिक श्रद्धा आहे. ही परंपरा कायमस्वरूपी जतन व्हावी तसेच श्री मंगळग्रह मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या विवाहेच्छुकांच्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात, या उद्देशाने मंगळग्रह सेवा संस्थेने काही वर्षांपूर्वी या सोहळ्याची सुरुवात केली. त्रिपुरारी पौर्णिमा अर्थात कार्तिकी पौर्णिमेच्या पवित्र पर्वावर आयोजित होणाऱ्या या सोहळ्याचे यंदा १५ वे वर्ष होते.

सोहळ्याच्या निमित्ताने वरराजा भगवान श्री विष्णूजी आणि वधूराणी श्री लक्ष्मी मातेची संबळ वाद्यांच्या गजरात मंगलरथातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत भाविकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. संबळच्या तालावर अनेक भाविकांनी जल्लोषपूर्ण नृत्य करीत आनंद व्यक्त केला. संपूर्ण मंदिर परिसरात भक्ती, उत्साह आणि मंगलमय वातावरण निर्माण झाले होते.
त्यानंतर दुपारी १२ वाजून १५ मिनिटांच्या शुभ मुहूर्तावर भगवान श्री विष्णूजी आणि श्री लक्ष्मी मातेचा प्रतिकात्मक विवाह पारंपरिक वैदिक पद्धतीने संपन्न झाला. या विवाह सोहळ्यात वरराजा भगवान श्री विष्णूजी यांचे मामा म्हणून पिळोदे (ता. अमळनेर, ह. मु. पुणे) येथील भटू प्रकाश शिंदे यांनी, तर वधूराणी श्री लक्ष्मी मातेचे मामा म्हणून अमळनेर येथील सुनील माणिक बिऱ्हाडे (ह. मु. जळगाव) यांनी भूमिका पार पाडली. हजारो भाविक वऱ्हाडींच्या भूमिकेत उपस्थित राहून या दैवी विवाह सोहळ्याचे साक्षीदार झाले.
मंदिराचे पुरोहित शुभम वैष्णव आणि प्रसाद भंडारी यांनी मुख्य पौरोहित्य करीत विधिवत मंगलाष्टके म्हटली. त्यांच्या मंत्रोच्चारात विवाहाचे सर्व धार्मिक विधी पार पडले. या वेळी पुरोहित जयेंद्र वैद्य, मंदार कुलकर्णी, वैभव लोकाक्षी, गणेश जोशी, अतुल जोशी, विनोद पाठक, चंद्रकांत जोशी, उमेश पाठक, चेतन नाईक आणि प्रवीण भंडारी यांनी सहकार्य केले.
सकाळी श्री मंगळग्रह देवांची महाआरती करण्यात आली. त्यानंतर दिवसभर मंदिर परिसरात भाविकांसाठी प्रसाद वाटपाची व्यवस्था करण्यात आली होती. विशेष म्हणजे, या विवाह सोहळ्यात अनावश्यक खर्च, भव्य सजावट आणि स्नेहभोजन यांसारख्या खर्चिक बाबींना फाटा देण्यात आला. अत्यंत साध्या पद्धतीने मात्र संपूर्ण धार्मिक विधी आणि पारंपरिक चालीरीतींचे पालन करून हा सोहळा पार पडला.
या सोहळ्याच्या पूर्वसंध्येला सोमवार, दि. २३ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ ते सायंकाळी ७.३० या वेळेत भगवान श्री विष्णूजी आणि श्री लक्ष्मी मातेच्या प्रतिकात्मक विवाहानिमित्त हळद व मेंदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. असंख्य माता-भगिनींच्या उपस्थितीत संगीताच्या साथीने हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी महिलांनी नृत्य आणि फुगडी खेळण्याचा मनमुराद आनंद घेतला. त्यामुळे मंदिर परिसरात मंगलमय आणि उत्सवी वातावरण निर्माण झाले होते.
मंगळग्रह सेवा संस्थेच्या वतीने समाजाभिमुख उपक्रमांतर्गत विवाह सोहळे अनावश्यक खर्च आणि पैशांची उधळपट्टी न करता साधेपणाने करण्याचा संदेश दिला जात आहे. विवाह हा संस्कार असून त्यामध्ये दिखाऊपणापेक्षा परंपरा, धार्मिक विधी आणि संस्कृतीला महत्त्व दिले पाहिजे, हा विचार संस्थेच्या उपक्रमातून मांडला जात आहे. याच संकल्पनेतून देवांचा विवाहदेखील कोणताही अनावश्यक खर्च न करता पारंपरिक चाली, रूढी आणि धार्मिक परंपरांचे जतन करून साजरा केला जातो.
हा सोहळा यशस्वी करण्यासाठी मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले, उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सचिव सुरेश बाविस्कर, सहसचिव दिलीप बहिरम, खजिनदार गिरीश कुळकर्णी, विश्वस्त अनिल अहिरराव, डी. ए. सोनवणे, मंगल सेवेकरी आशाताई महाले, प्रकाश मेखा, विनोद कदम आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आर. जी. चव्हाण यांच्यासह मंदिरातील सेवेकऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
साधेपणा, धार्मिक श्रद्धा आणि परंपरांचे जतन यांचा सुंदर संगम असलेल्या श्री तुळशी विवाह सोहळ्याने अमळनेरमध्ये भक्तिमय वातावरण निर्माण केले. हजारो भाविकांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या १५ व्या दैवी विवाह सोहळ्याने अनावश्यक खर्च टाळून संस्कृती जपण्याचा महत्त्वपूर्ण संदेश दिला.



