Home क्राईम गोराडखेडा खून प्रकरणाचा उलगडा ; दोघे आरोपी ताब्यात

गोराडखेडा खून प्रकरणाचा उलगडा ; दोघे आरोपी ताब्यात

0
6

पाचोरा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । पाचोरा तालुक्यातील गोराडखेडा येथे शेतीच्या व्यवहारासाठी आलेल्या ५० वर्षीय संजय धनराज तेली यांच्या अपहरण आणि बेपत्ता होण्याच्या प्रकरणाचा जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने उलगडा केला आहे. शेतीच्या वादातून लोखंडी पाईपने मारहाण करून त्यांची हत्या केल्याची कबुली मुख्य संशयित आरोपीने दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यानंतर दुसऱ्या आरोपीच्या मदतीने मृतदेह गोणीत भरून बहुळा नदीत फेकल्याचे तपासात समोर आले असून, पोलिसांनी नदीत शोधमोहीम राबवून मृतदेह हस्तगत केला आहे. या प्रकरणी गोराडखेडा येथील दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १८ नोव्हेंबर २०२६ रोजी फिर्यादी यांनी पाचोरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यांचे मित्र संजय धनराज तेली (वय ५०, रा. कन्नड, जि. छत्रपती संभाजीनगर) हे शेतीच्या व्यवहारासाठी पाचोरा तालुक्यातील गोराडखेडा येथे आले होते. मात्र, त्यानंतर अज्ञात व्यक्तींनी अज्ञात कारणासाठी त्यांचे अपहरण केल्याचा संशय फिर्यादी यांनी व्यक्त केला होता. या तक्रारीवरून पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना या गुन्ह्याचा समांतर तपास करून प्रकरण उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक गायकवाड यांनी आपल्या अधिपत्याखालील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे तपास पथक तयार केले. पथकाने गोपनीय माहिती संकलित करून बातमीदारांच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीच्या आधारे तपासाला दिशा दिली. या तपासादरम्यान राहुल धर्मा पाटील (वय ४५) आणि संजय वामन भिल्ल (वय ५५), दोघेही रा. गोराडखेडा, ता. पाचोरा यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांची चौकशी केली असता, राहुल धर्मा पाटील याने शेतीच्या वादातून संजय धनराज तेली यांची हत्या केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत संजय तेली यांच्यासोबत असलेल्या शेतीच्या वादातून राहुल पाटील याने लोखंडी पाईपने त्यांच्या डोक्यावर वार करून त्यांची हत्या केली. त्यानंतर संजय वामन भिल्ल याच्या मदतीने मृतदेह गोणीत भरून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने बहुळा नदीत फेकून दिल्याचे चौकशीत समोर आले. या माहितीनंतर पोलिसांनी बहुळा नदी परिसरात शोधमोहीम राबवली. या मोहिमेत संजय तेली यांचा मृतदेह हस्तगत करण्यात आला. या प्रकरणाच्या तपासादरम्यान भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १०३(१), २३८, १४०(१), ३(५) आणि ३१५ ही वाढीव कलमे लावण्यात आली आहेत. गुन्ह्याचा पुढील तपास पाचोरा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप शेवाळे करीत आहेत. तपासातून या घटनेशी संबंधित आणखी काही बाबी समोर येतात का, याकडे लक्ष लागले आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड आणि पाचोरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्या नेतृत्वाखाली तपास पथकाने कामगिरी बजावली. या पथकात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल लक्ष्मण पाटील, पोलीस नाईक राहुल पाटील, पोलीस कॉन्स्टेबल जितेंद्र पाटील, रतन गिते, ईश्वर पाटील, भूषण पाटील आणि चालक पोलीस हेड कॉन्स्टेबल बाबासाहेब पाटील यांचा समावेश होता. तसेच पाचोरा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप शेवाळे आणि पोलीस हेड कॉन्स्टेबल दिलीप वाघमोडे यांनीही या तपासात सहभाग घेतला.


Protected Content

Play sound