Home Cities अमळनेर दुष्काळजन्य परिस्थितीत शिरूडमध्ये पाण्याची उघडपणे नासाडी! व्हॉल्व्हमधून हजारो लिटर पाणी गटारीत ;...

दुष्काळजन्य परिस्थितीत शिरूडमध्ये पाण्याची उघडपणे नासाडी! व्हॉल्व्हमधून हजारो लिटर पाणी गटारीत ; प्रशासनाचे दुर्लक्ष

0
38

अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । राज्यात अनेक भागांत दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली असून, पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना मोठी कसरत करावी लागत आहे. अनेक गावांमधील विहिरींची पाणीपातळी खालावली असून काही ठिकाणी विहिरी कोरड्या पडल्या आहेत. पाण्याअभावी शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचेही मोठे नुकसान होत आहे. अशा गंभीर परिस्थितीत अमळनेर तालुक्यातील शिरूड गावात मात्र पिण्याच्या पाण्याची हजारो लिटर नासाडी होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. गावातील पाणीपुरवठा करणाऱ्या व्हॉल्व्हमधून मोठ्या प्रमाणात पाणी वाहून थेट गटारीत जात असल्याने ग्रामपंचायत प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

शिरूड येथील ग्रामपंचायत कार्यालयाजवळील मारोती मंदिरालगत असलेल्या पाणीपुरवठ्याच्या व्हॉल्व्हमधून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होत असल्याचे दिसून आले. सकाळच्या सुमारास गावाला पाणीपुरवठा सुरू असताना या व्हॉल्व्हमधून पाणी वेगाने बाहेर पडून रस्त्यावरून वाहत थेट गटारीत जात होते. पिण्यासाठी वापरले जाणारे मौल्यवान पाणी अशा प्रकारे वाया जात असल्याने ग्रामस्थांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे, गावाबाहेरील पाण्याच्या टाकीजवळ असलेल्या व्हॉल्व्हमधूनही अशाच प्रकारे पाण्याची गळती होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे गावातील केवळ एका ठिकाणी नव्हे, तर पाणीपुरवठा व्यवस्थेतील अन्य ठिकाणीही देखभाल आणि दुरुस्तीची आवश्यकता असल्याचे स्पष्ट होत आहे. दोन्ही ठिकाणी व्हॉल्व्हमधून पाणी वाया जात असताना संबंधित यंत्रणेचे याकडे लक्ष का जात नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

एकीकडे प्रशासनाकडून नागरिकांना पाण्याचा प्रत्येक थेंब जपून वापरण्याचे आवाहन केले जात आहे. पाणी बचतीसाठी विविध उपाययोजना करण्यावर भर दिला जात असताना दुसरीकडे गावातील पिण्याचे पाणी हजारो लिटरच्या प्रमाणात गटारीत वाहून जात असल्याचे चित्र विरोधाभास निर्माण करणारे आहे. विशेष म्हणजे ग्रामपंचायत कार्यालयासमोरच हा प्रकार घडत असल्याने ग्रामपंचायत प्रशासनाच्या कार्यक्षमतेबाबत ग्रामस्थांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. व्हॉल्व्हमधील गळती वेळेत दुरुस्त केली असती, तर पाण्याचा होणारा अपव्यय सहज टाळता आला असता. मात्र, अशा प्रकारांकडे दुर्लक्ष झाल्यास भविष्यात पाणीटंचाईच्या काळात गावाला अधिक गंभीर समस्यांना सामोरे जावे लागू शकते. दुष्काळाची तीव्रता वाढण्यापूर्वीच पाणीपुरवठा यंत्रणेची नियमित तपासणी आणि आवश्यक दुरुस्ती करणे गरजेचे असल्याचे मत ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.

याबाबत शिरूडचे ग्रामसेवक आर. एन. पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले की, “याबाबत मला कल्पना नाही. आजच त्या ठिकाणी हा प्रकार घडला असावा. यासंदर्भात ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांशी बोलून संबंधित व्हॉल्व्हची तातडीने दुरुस्ती करण्यास सांगतो.” ग्रामसेवकांनी दुरुस्तीचे आश्वासन दिले असले तरी प्रत्यक्षात गळती कधी थांबवली जाते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान, ग्रामपंचायत प्रशासनाने मारोती मंदिराजवळील तसेच गावाबाहेरील पाण्याच्या टाकीजवळील दोन्ही व्हॉल्व्हची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. यासोबतच गावातील संपूर्ण पाणीपुरवठा यंत्रणेची तपासणी करून अन्य ठिकाणीही गळती असल्यास ती त्वरित थांबवावी. पाणीपुरवठ्याचे योग्य नियोजन करून उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर होईल, यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


Protected Content

Play sound