जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहराचे ग्रामदैवत आणि सांस्कृतिक वैभव असलेल्या पवित्र श्रीराम रथोत्सवात हिंदू-मुस्लिम ऐक्याचे सुंदर दर्शन घडले. दरवर्षीप्रमाणे यंदाही भिलपुरा येथील लालशाह बाबा दर्ग्यावर श्रीराम रथाचे आगमन होताच सै. नियाज अली भैय्या फाउंडेशनच्या वतीने मुस्लिम बांधवांनी रथाचे उत्साहात स्वागत केले. पुष्पवृष्टी, फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव, पुष्पहार आणि गळाभेटीच्या माध्यमातून धार्मिक सलोखा आणि सामाजिक एकतेचा संदेश देण्यात आला.
श्रीराम रथ लालशाह बाबा दर्ग्यावर पोहोचल्यानंतर सर्वप्रथम हिंदू बांधव आणि रथोत्सव समितीच्या वतीने अप्पा महाराजांचे परममित्र पीर लालशाह बाबा यांच्या दर्ग्यावर अत्यंत भक्तिभावाने चादर आणि नारळ अर्पण करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी प्रार्थना करून परंपरेनुसार दर्ग्याप्रती श्रद्धा व्यक्त केली.

यानंतर सै. नियाज अली भैय्या फाउंडेशन आणि मुस्लिम बांधवांच्या वतीने श्रीराम रथावर पुष्पवृष्टी करण्यात आली. फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव करत रथोत्सव समितीचे पदाधिकारी, रथाला मोगरी लावणारे सेवेकरी, चोपदार तसेच बंदोबस्तासाठी उपस्थित वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले. यावेळी एकमेकांची गळाभेट घेत आनंद व्यक्त करण्यात आला. या स्वागत सोहळ्याला उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे, रथोत्सव समितीचे अध्यक्ष भालचंद्र पाटील, सै. अयाज अली नियाज अली, प्रभाकर चौधरी, शनिपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक नितीन पाटील, रामानंदनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक मधुकर साळवे, विलास हरी चौधरी, अनिकेत पाटील, जयवर्धन नेवे, राहुल चौधरी, भानुदास चौधरी, पंडित पाटील, अमोल चौधरी, सुरेश सपके आणि सुजित चौधरी यांची उपस्थिती होती.
तसेच हाजी शकूर बादशाह, शेख हाजी जलालुद्दीन, जावेद अहमद, किशोर पाटील, रोहन शैलेंद्र, मोईन असगर, इम्तियाज अली, अकबर इब्राहिम, युसूफ अझीझ, आदिल गनी, मोहम्मद नईम यांच्यासह अनेक हिंदू-मुस्लिम बांधव उपस्थित होते. जळगावच्या श्रीराम रथोत्सवाला धार्मिक परंपरेसोबतच सामाजिक सलोख्याचीही मोठी परंपरा लाभली आहे. लालशाह बाबा दर्ग्यावर श्रीराम रथाचे स्वागत करण्याची ही परंपरा विविध धर्मीयांमधील परस्पर आदर, श्रद्धा आणि बंधुभाव अधोरेखित करते. यंदाच्या स्वागत सोहळ्यातही दोन्ही समाजातील नागरिकांनी एकत्र येत ऐक्याचा संदेश दिला.



