रावेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । वैद्यकीय क्षेत्रात ज्ञानासोबतच प्रत्यक्ष कौशल्य आणि तत्परता अत्यंत महत्त्वाची असते. विशेषतः नवजात शिशूंच्या उपचारांमध्ये योग्य वेळी घेतलेला निर्णय बाळाचे प्राण वाचविण्यासाठी निर्णायक ठरू शकतो. याच पार्श्वभूमीवर खेळाधारित शिक्षण पद्धतीचा अभिनव प्रयोग जळगावमध्ये राबविण्यात आला. ‘महानेकॉन २०२६’ आणि ‘सेकंड खान्देशकॉन’ अंतर्गत वनिता मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल येथे आयोजित ‘केअर’ (क्रिटिकल असेसमेंट, रिससिटेशन अँड इसेन्शियल्स इन निओनेटल नर्सिंग) या विशेष कार्यशाळेत १२० हून अधिक परिचारिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
या कार्यशाळेचे संचालक मुंबई येथील डॉ. जेसल शेठ यांच्या मार्गदर्शनाखाली आणि महाराष्ट्र निओनेटल फोरमचे (एनएनएफ) अध्यक्ष डॉ. विनय जोशी यांच्या नेतृत्वाखाली आयोजन करण्यात आले. आयोजन समितीमध्ये डॉ. अविनाश भोसले यांचाही महत्त्वपूर्ण सहभाग होता. नवजात शिशूंच्या आरोग्यसेवेत कार्यरत परिचारिकांचे ज्ञान अद्ययावत करणे, त्यांची तांत्रिक कौशल्ये विकसित करणे आणि आपत्कालीन परिस्थितीत आत्मविश्वासाने काम करण्यासाठी त्यांना सक्षम बनविणे हा या कार्यशाळेचा मुख्य उद्देश होता.

कार्यशाळेदरम्यान नवजात शिशूंची सुरक्षितता, पुनर्जीवन प्रक्रिया (निओनेटल रिससिटेशन), सेप्सिसचे लवकर निदान, जन्मानंतरचा महत्त्वपूर्ण ‘गोल्डन अवर’, श्वसन सहाय्य, व्हेंटिलेटरची सुरक्षित हाताळणी आणि आपत्कालीन परिस्थितीचे व्यवस्थापन अशा विविध विषयांवर सविस्तर प्रशिक्षण देण्यात आले. नवजात बाळाच्या जन्मानंतरच्या पहिल्या तासात कोणती काळजी घ्यावी, गंभीर परिस्थितीत कोणत्या वैद्यकीय प्रक्रिया तातडीने कराव्यात आणि उपचारादरम्यान कोणती खबरदारी घ्यावी, याबाबत परिचारिकांना मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यशाळेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे खेळाधारित शिक्षण पद्धतीचा (गेमिफिकेशन) केलेला प्रभावी वापर. पारंपरिक व्याख्यान पद्धतीऐवजी विविध शैक्षणिक खेळ, सांघिक आव्हाने, सिम्युलेशन, प्रश्नमंजुषा आणि प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्यात आले. त्यामुळे सहभागी परिचारिकांना केवळ सैद्धांतिक माहिती मिळण्याऐवजी प्रत्यक्ष परिस्थितीचा अनुभव घेऊन कौशल्ये आत्मसात करण्याची संधी मिळाली.
या उपक्रमात मुंबईचे डॉ. जेसल शेठ, ठाण्याचे डॉ. किरण मोरे, बीडचे डॉ. सचिन जेठलिया, जळगावच्या डॉ. नेहा काबरा, डॉ. शैलजा चव्हाण, रावेरच्या डॉ. योगिता पाटील, जामनेरचे डॉ. अमोल सेर, जळगावच्या डॉ. सारिका सुरवाडे, डॉ. अनंत बेंडाळे आणि डॉ. अविनाश खेवडे यांनी सहभाग नोंदवून मार्गदर्शन केले. विविध ठिकाणांहून आलेल्या तज्ज्ञांच्या अनुभवाचा लाभ परिचारिकांना मिळाला. कार्यशाळेत सहभागी झालेल्या परिचारिकांनी विविध उपक्रमांमध्ये उत्साहाने सहभाग घेतला. सांघिक भावना, परस्पर संवाद आणि प्रत्यक्ष कृतीतून शिकण्याच्या पद्धतीमुळे संपूर्ण प्रशिक्षण अधिक रंजक आणि परिणामकारक ठरले. खेळाच्या माध्यमातून वैद्यकीय ज्ञान सहज आत्मसात करता येते आणि प्रत्यक्ष रुग्णसेवेच्या वेळी अधिक आत्मविश्वासाने व तत्परतेने काम करता येते, हे या उपक्रमातून अधोरेखित झाले.



