Home Cities जळगाव जळगावच्या अयप्पा स्वामी मंदिरात २३ नोव्हेंबरपासून कार्तिक पौर्णिमा उत्सव; १०८ नाण्यांनी होणार...

जळगावच्या अयप्पा स्वामी मंदिरात २३ नोव्हेंबरपासून कार्तिक पौर्णिमा उत्सव; १०८ नाण्यांनी होणार अभिषेक

0
4

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील निवृत्तीनगर येथील केरळी महिला ट्रस्टच्या अयप्पा स्वामी मंदिरात सोमवार, दि. २३ नोव्हेंबरपासून कार्तिक पौर्णिमा उत्सवाला भक्तिमय वातावरणात प्रारंभ होणार आहे. मंगळवार, दि. २४ नोव्हेंबर रोजी कार्तिक पौर्णिमा आणि कृत्तिका नक्षत्राचा विशेष शुभयोग जुळून येत असल्याने मंदिरात विविध धार्मिक विधी, विशेष पूजा, अभिषेक आणि आकर्षक सजावटीचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवासाठी मंदिर प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरू असून हजारो भाविकांच्या उपस्थितीची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

यंदा पौर्णिमा तिथी सोमवार, २३ नोव्हेंबर रोजी रात्री ११.३० वाजता सुरू होऊन मंगळवार, २४ नोव्हेंबर रोजी रात्री ९.४५ वाजेपर्यंत असणार आहे. विशेष म्हणजे, कृत्तिका नक्षत्रयुक्त पौर्णिमेचा पवित्र मुहूर्त २४ नोव्हेंबर रोजी पहाटे २.०७ ते रात्री ९.४५ वाजेपर्यंत राहणार आहे. त्यानंतर रात्री ९.४५ वाजता कार्तिक नक्षत्राला प्रारंभ होऊन ते रात्री १२.३० वाजेपर्यंत राहणार आहे. केरळमधील गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली धार्मिक विधींचे मुहूर्त निश्चित करण्यात आले असून त्यानुसार उत्सवाचे नियोजन करण्यात आले आहे.

निवृत्तीनगर परिसरातील अयप्पा स्वामी मंदिर हे उत्तर महाराष्ट्रातील एकमेव अयप्पा स्वामी मंदिर म्हणून ओळखले जाते. जानेवारी २००० मध्ये तामिळनाडू येथील गुरुजींच्या हस्ते मंदिरातील मूर्तींची शास्त्रोक्त पद्धतीने प्राणप्रतिष्ठा करण्यात आली होती. मंदिरात महाबलीपुरम येथून आणलेली कार्तिकस्वामींची मूर्ती, कोट्टायम तंथनम प्रतिकृती, मदुराई येथील मीनाक्षी देवी आणि गुरुवायूर श्री विष्णू यांच्या विलोभनीय मूर्ती विराजमान आहेत. याशिवाय मंदिर परिसरात नवग्रहांसह विविध देवतांची मंदिरे असून भाविकांना वर्षभर दर्शनासाठी ही मंदिरे खुली असतात.

कार्तिक पौर्णिमा उत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे धन, सोने आणि चांदी अशा तीन प्रकारचे विशेष अभिषेक होय. या धार्मिक विधींसाठी भाविकांकडून चिल्लर नाणी संकलित केली जातात. तसेच चेन्नई येथून खास मागविण्यात आलेल्या १०८ नाण्यांच्या माध्यमातून सोने आणि चांदीचा अभिषेक केला जातो. या अनोख्या धार्मिक परंपरेमुळे उत्सवाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. कार्तिक पौर्णिमेच्या पवित्र पर्वावर अयप्पा स्वामींचे दर्शन शुभ मानले जात असल्याने दरवर्षी हजारो भाविक नवसपूर्तीसाठी आणि मनोकामना पूर्ण होण्याच्या श्रद्धेने मंदिरात उपस्थित राहतात.

गेल्या २५ वर्षांपासून केरळी धार्मिक परंपरेनुसार या मंदिरात कार्तिक पौर्णिमा उत्सव साजरा केला जात आहे. या निमित्ताने मंदिराची विशेष सजावट करण्यात येते आणि भाविकांसाठी दर्शनाची व्यवस्था केली जाते. यंदाही मंदिर परिसरात आकर्षक रोषणाई, भव्य मंडप उभारणी आणि धार्मिक विधींसाठी आवश्यक तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. उत्सवादरम्यान शहरातील विविध मान्यवरांच्या हस्ते विशेष पूजा आणि अभिषेक विधी संपन्न होणार आहेत.

कार्तिक पौर्णिमेच्या या पवित्र पर्वावर अयप्पा स्वामींच्या दर्शनासाठी जळगावसह परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. यंदा पौर्णिमा आणि कृत्तिका नक्षत्राचा विशेष शुभयोग जुळून येत असल्याने उत्सवाचे धार्मिक महत्त्व अधिक वाढले आहे. भाविकांनी कुटुंबासह उपस्थित राहून दर्शनाचा आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केरळी महिला ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी ट्रस्टच्या संस्थापक अध्यक्ष वासंती अय्यर यांच्याशी ९४०५१४३२३५ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.


Protected Content

Play sound