मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील इच्छापूर आणि निमखेडी परिसरात पूर्णा नदीपात्रातून कथित अवैध वाळू उपसा आणि वाहतूक सुरूच असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. या गंभीर प्रकाराबाबत यापूर्वी बातमी प्रसिद्ध करून प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले होते. मात्र, बातमी प्रसिद्ध होऊनही परिस्थितीत बदल झालेला नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
पूर्णा नदीपात्रातून मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा होत असल्याचा आरोप होत असताना महसूल विभाग आणि संबंधित यंत्रणांकडून ठोस कारवाई का केली जात नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे. बातमीचा धसका नाही आणि कारवाईचा वचकही नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली असून या अवैध वाळू उपशाला नेमके कोणाचे अभय आहे, असा संतप्त प्रश्न नागरिक विचारत आहेत.
अवैध वाळू उत्खननामुळे नदीपात्राच्या नैसर्गिक रचनेला धोका निर्माण होण्याची शक्यता असून शासनाच्या महसुलाचेही नुकसान होत आहे. त्यामुळे या प्रकाराकडे केवळ अवैध वाहतूक म्हणून न पाहता पर्यावरण आणि महसुलाच्या दृष्टीनेही गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. इच्छापूर आणि निमखेडी परिसरात विशेष पथक पाठवून नदीपात्राची प्रत्यक्ष पाहणी करावी, अवैध उत्खनन आणि वाहतुकीत सहभागी असलेल्यांची चौकशी करावी, तसेच दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
आता प्रशासन नेमकी काय भूमिका घेणार? बातमी प्रसिद्ध होऊनही कथित अवैध वाळू उपसा सुरू असल्यास संबंधित यंत्रणांनी आतापर्यंत काय कारवाई केली, नदीपात्रावर नियमित देखरेख ठेवली जाते का आणि अवैध वाहतूक करणाऱ्यांवर किती कारवाया झाल्या, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यामुळे मुक्ताईनगर महसूल प्रशासन या प्रकरणाची दखल घेऊन प्रत्यक्ष कारवाई करणार का, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.



