कासोदा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । साधना विद्यालय, कासोदा येथील १९९२-९३ च्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांचा ‘बिछडे पंछी’ ग्रुपचा सलग १२ वा गेट-टुगेदर मोठ्या उत्साहात आणि भावपूर्ण वातावरणात पार पडला. ‘सनीचा ढाबा’ या कौटुंबिक ठिकाणी आयोजित या स्नेहमेळाव्यात जुन्या आठवणींना उजाळा देत मित्रांनी मैत्रीचे बंध पुन्हा घट्ट केले. कोणताही खंड न पडता सलग १२ वर्षे हा स्नेहमेळावा आयोजित होणे ही कासोदा पंचक्रोशीसाठी विशेष कौतुकाची बाब ठरली.
सकाळी ११ वाजेपर्यंत सर्व बालमित्र नियोजित ठिकाणी एकत्र जमले. सुरुवातीला सर्वांनी मिसळपावच्या न्याहरीचा आस्वाद घेतला. त्यानंतर दुपारी १२ वाजता औपचारिक कार्यक्रमाला सुरुवात झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल पाटील यांनी केले. प्रास्ताविकातून सर्व मित्रांनी वयाच्या नव्वदीपर्यंत दरवर्षी या स्नेहमेळाव्याला न चुकता उपस्थित राहावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. तसेच मनातील न्यूनगंड, शंका आणि गैरसमज दूर ठेवून प्रत्यक्ष भेटीगाठींतून संवाद वाढवावा, असे आवाहन करण्यात आले.

यावेळी दिवंगत बालमित्र स्व. प्रदीप पाटील, स्व. संतोष कुंभार, स्व. साहेबराव सोनवणे, स्व. सचिन पिंगळे, स्व. विनोद शिंपी आणि स्व. श्याम पाटील यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. त्याचबरोबर दिवंगत गुरुवर्य स्व. बी. जी. आबा सर, स्व. ए. एस. पाटील सर, स्व. ए. एन. पाटील सर, स्व. वाय. ई. बापू सर, स्व. बी. एस. पवार सर, स्व. एन. डी. पाटील सर, स्व. डी. एम. पाटील सर, स्व. एन. आर. पवार सर, स्व. सोनवणे सर, स्व. शिंदे अण्णा सर, स्व. एल. बी. पाटील मॅडम, स्व. बी. एन. पाटील सर आणि स्व. पठाण मॅडम यांच्यासह सर्व ज्ञात-अज्ञात दिवंगत बालमित्र, शिक्षक, पालक व नातेवाईकांना दोन मिनिटे मौन पाळून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
काही कारणांमुळे प्रत्यक्ष उपस्थित राहू न शकलेल्या सचिन बियाणी, प्रदीप बागल, प्रदीप पाटील (PSI) आणि निलेश जाधव यांच्याशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधण्यात आला. प्रत्यक्ष भेट शक्य नसतानाही तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मित्रांनी एकमेकांशी संपर्क साधत स्नेहमेळाव्यातील सहभाग कायम ठेवला.
यानंतर मनोगत व्यक्त करण्याचा कार्यक्रम रंगला. दिनेश पाटील, प्रवीण पाटील, योगेश पिंगळे, संदीप पाटील, गोपाल पाटील, गिरीश पाटील, सुनील पाटील आणि नारायण भाऊ यांनी आपल्या भावना व अनुभव व्यक्त केले. दिनेश पाटील यांनी खऱ्या मैत्रीची मार्मिक व्याख्या मांडली. त्यांच्या मनोगताने उपस्थित मित्र भावूक झाले आणि काही काळ वातावरणात हळवेपणा निर्माण झाला. जुन्या आठवणी, शाळेतील गंमतीजमती आणि आयुष्यातील अनुभव यांना उजाळा देताना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान दिसत होते.
यावेळी प्रमोद आप्पा यांनी विविध शासकीय योजनांचा लाभ कसा घेता येईल, याबाबत मार्गदर्शन केले. योगेश पिंगळे यांनी आपण सुरू करत असलेल्या नवीन फर्मविषयी माहिती दिली. तर डॉ. सुशील मंत्री यांनी दैनंदिन आरोग्याची काळजी, विशेषतः पन्नाशीनंतर घ्यावयाची खबरदारी, वेळोवेळी करावयाच्या वैद्यकीय तपासण्या आणि आरोग्यविषयक विविध शंका व पर्यायांवर सविस्तर मार्गदर्शन केले. मैत्रीच्या गप्पांसोबत आरोग्य आणि सामाजिक विषयांवरील माहितीची देवाणघेवाणही या मेळाव्याचे वैशिष्ट्य ठरले.
दुपारी २ वाजता सर्व मित्रांनी पातोडी भाजी, पनीर मसाला, भाकरी, पोळी आणि गुलाबजाम अशा स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेतला. भोजनानंतर एसी हॉलमध्ये पुन्हा गप्पांची मैफल रंगली. दुपारी ३ वाजता आइस्क्रीमचा आस्वाद घेत जुन्या आठवणी, विनोद आणि विविध अनुभवांची देवाणघेवाण करण्यात आली. शालेय जीवनातील मैत्री आजही तितक्याच जिव्हाळ्याने टिकून असल्याचे या भेटीतून दिसून आले.
यंदाच्या स्नेहमेळाव्याला गिरीश पाटील, अनिल पाटील, संदीप पाटील, कल्याण पाटील, लोकेश पांडे, नारायण वाणी, नितीन शितोळे, दिनेश पाटील, डॉ. सुशील मंत्री, योगेश पिंगळे, श्रीराम कोतकर, भीमराव पाटील, लोटन कुंभार, विनोद निकम, गोपाल पाटील, गिरधर पटेल, प्रमोद पाटील, योगेश झवर, सुनील पाटील, प्रमोद मराठे, रवींद्र पाटील, प्रवीण पाटील, रवींद्र पाटील आणि विजय पाटील असे एकूण २४ मित्र उपस्थित होते. अविनाश सोनगीरे हे यावेळी अनुपस्थित होते.
स्नेहमेळाव्याची सांगता सायंकाळी ४ वाजता झाली. यावेळी सर्व मित्रांनी एकमेकांची गळाभेट घेत पुढील वर्षीही कोणताही खंड न पडू देता पुन्हा एकत्र येण्याचा शब्द दिला आणि आनंदी आठवणी सोबत घेऊन परतीचा प्रवास सुरू केला.
साधना विद्यालयाच्या १९९२-९३ बॅचच्या ‘बिछडे पंछी’ ग्रुपचा सलग १२ वा स्नेहमेळावा मैत्री, आठवणी, भावनिक क्षण आणि उपयुक्त मार्गदर्शनाने अविस्मरणीय ठरला. शाळा संपल्यानंतरही वर्षानुवर्षे टिकून असलेले मैत्रीचे नाते या उपक्रमातून पुन्हा एकदा अधोरेखित झाले.



