Home क्रीडा गोदावरी अभियांत्रिकीच्या शिरपेचात मानाचा तुरा; आठ खेळाडू राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेसाठी पात्र!

गोदावरी अभियांत्रिकीच्या शिरपेचात मानाचा तुरा; आठ खेळाडू राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेसाठी पात्र!

0
3

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । क्रीडा क्षेत्रात जळगावच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. गोदावरी फाउंडेशन संचालित गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयातील तब्बल आठ खेळाडूंची अखिल भारतीय आंतरविद्यापीठ तलवारबाजी स्पर्धेसाठी निवड झाली आहे. येत्या ४ ते १२ डिसेंबर २०२६ या कालावधीत जम्मू विद्यापीठ, जम्मू येथे होणाऱ्या प्रतिष्ठेच्या राष्ट्रीय स्पर्धेत हे खेळाडू डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ (डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ), लोणेरे यांचे प्रतिनिधित्व करणार आहेत. एकाच महाविद्यालयातील आठ खेळाडूंनी राष्ट्रीय स्तरावर मजल मारल्याने महाविद्यालयासह संपूर्ण गोदावरी फाउंडेशनमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या खेळाडूंमध्ये सायली पाटील (तृतीय वर्ष, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग), सोनम गुंजाळ (द्वितीय वर्ष, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग), तेजस पाटील (अंतिम वर्ष, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स), वैष्णवी साबळे (अंतिम वर्ष, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स), मयूर कोळी (अंतिम वर्ष, मेकॅनिकल इंजिनिअरिंग), तुषार पाटील (द्वितीय वर्ष, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स), साक्षी उबाळे (अंतिम वर्ष, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग) आणि निसर्गा पाटील (द्वितीय वर्ष, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स) यांचा समावेश आहे.

या सर्व खेळाडूंनी यापूर्वी आयोजित आंतरविभागीय तलवारबाजी स्पर्धेत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले होते. त्यांच्या सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी त्यांची निवड झाली आहे. नियमित सराव, कठोर मेहनत, शिस्त आणि जिद्दीच्या बळावर या खेळाडूंनी ही महत्त्वपूर्ण कामगिरी साध्य केली आहे. आता राष्ट्रीय स्तरावर आपले कौशल्य सिद्ध करण्याची संधी त्यांना मिळणार आहे.

विशेष म्हणजे, एकाच महाविद्यालयातील आठ खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड होणे ही गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील यशस्वी वाटचालीची साक्ष मानली जात आहे. शिक्षणासोबतच क्रीडा क्षेत्रातही विद्यार्थ्यांना प्रोत्साहन आणि योग्य मार्गदर्शन मिळत असल्याचे या यशातून अधोरेखित झाले आहे.

या उल्लेखनीय यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील, क्रीडा संचालक डॉ. जयंत जाधव, सर्व विभागप्रमुख आणि शिक्षकवृंद यांनी निवड झालेल्या खेळाडूंचे अभिनंदन केले. आगामी राष्ट्रीय स्पर्धेतही खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करून महाविद्यालयासह विद्यापीठाचा नावलौकिक देशपातळीवर उंचवावा, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.

गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, सदस्य डॉ. केतकी पाटील, डॉ. वैभव पाटील आणि डॉ. अनिकेत पाटील यांनीही सर्व खेळाडूंचे विशेष कौतुक केले. राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झालेल्या खेळाडूंना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत त्यांच्या यशाबद्दल आनंद व्यक्त केला.


Protected Content

Play sound