Home आरोग्य महादेव सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमध्ये ८० वर्षीय वृद्धाच्या मेंदूची गुंतागुंतीची...

महादेव सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमध्ये ८० वर्षीय वृद्धाच्या मेंदूची गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी!

0
5

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मेंदूमध्ये मोठ्या प्रमाणात रक्त साचून जीवघेण्या स्थितीत पोहोचलेल्या ८० वर्षीय वृद्धाला जळगावातील महादेव सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमधील डॉक्टरांनी यशस्वी शस्त्रक्रिया करून जीवनदान दिले आहे. रुग्णाची प्रकृती अत्यंत गंभीर असतानाही एमसीएच न्यूरोसर्जन डॉ. अनिकेत पाटील यांनी तातडीने अतिजोखमीची शस्त्रक्रिया केली. विशेष म्हणजे, शस्त्रक्रियेनंतर दुसऱ्याच दिवशी रुग्ण शुद्धीवर येऊन प्रतिसाद देऊ लागले, तर अवघ्या दोन दिवसांत ते स्वतःच्या पायाने चालत घरी परतले. या संपूर्ण उपचाराचा खर्च शासकीय योजनेअंतर्गत मोफत करण्यात आला.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित ८० वर्षीय वृद्धाला अचानक शरीराच्या उजव्या बाजूला अशक्तपणा जाणवू लागला. त्यांना बोलता येत नव्हते, डॉक्टरांच्या सूचनांना प्रतिसाद देता येत नव्हता, तसेच स्वतःहून डोळेही उघडता येत नव्हते. प्रकृती अत्यंत गंभीर झाल्याने त्यांना तातडीने महादेव सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. रुग्णाची नाजूक अवस्था लक्षात घेऊन डॉक्टरांनी वेळ न दवडता आवश्यक वैद्यकीय तपासण्या सुरू केल्या.

सीटी ब्रेन (CT Brain) तपासणीमध्ये मेंदूच्या आवरणाखाली मोठ्या प्रमाणात रक्त साचल्याचे निदर्शनास आले. वैद्यकीय भाषेत या स्थितीला ‘सबअ‍ॅक्यूट सबड्युरल हेमॅटोमा’ असे म्हणतात. मेंदूच्या आवरणाखाली साचलेल्या रक्तामुळे मेंदूवर प्रचंड दबाव निर्माण झाला होता. परिणामी मेंदू आपल्या सामान्य स्थितीपासून मध्यभागी सरकला होता. ही स्थिती रुग्णाच्या जीवाला गंभीर धोका निर्माण करणारी असल्याने तातडीने शस्त्रक्रिया करणे आवश्यक होते.

रुग्णाचे वय ८० वर्षे आणि प्रकृती अत्यंत नाजूक असल्याने शस्त्रक्रिया मोठ्या जोखमीची होती. मात्र, वेळेचे महत्त्व ओळखून डॉक्टरांनी तातडीने आपत्कालीन शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला. त्यानुसार एमसीएच न्यूरोसर्जन डॉ. अनिकेत पाटील यांनी मेंदूच्या डाव्या बाजूला ‘फ्रंटो-टेम्पोरो-पॅरिएटल डिकंप्रेसिव्ह क्रॅनिएक्टॉमी’ ही अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडली. या प्रक्रियेद्वारे मेंदूवर दबाव निर्माण करणारे साचलेले रक्त बाहेर काढण्यात आले.

या महत्त्वपूर्ण शस्त्रक्रियेदरम्यान न्यूरोसर्जरी सिनिअर रेसिडेंट डॉ. श्रुती खंडागळे आणि जनरल सर्जरी रेसिडेंट डॉ. पोमेश यांनी मोलाचे सहकार्य केले. भूलतज्ज्ञ म्हणून डॉ. ब्रम्हाटे यांनी जबाबदारी सांभाळली. संपूर्ण वैद्यकीय पथकाच्या समन्वयामुळे ही अतिजोखमीची शस्त्रक्रिया यशस्वी झाली.

शस्त्रक्रियेनंतर वृद्ध रुग्णाच्या प्रकृतीत अपेक्षेपेक्षा वेगाने सुधारणा होऊ लागली. दुसऱ्याच दिवशी ते पूर्णपणे शुद्धीवर आले आणि डॉक्टरांनी दिलेल्या सूचनांना व्यवस्थित प्रतिसाद देऊ लागले. त्यानंतर त्यांच्या प्रकृतीत आणखी सुधारणा झाली. प्रकृती स्थिर झाल्यानंतर अवघ्या दोन दिवसांत त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. विशेष म्हणजे, गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल झालेले हे वृद्ध आता स्वतःच्या पायाने चालण्यास सक्षम झाले आहेत.

या उपचारातील आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून करण्यात आलेल्या या महागड्या शस्त्रक्रियेचा संपूर्ण खर्च शासकीय आरोग्य योजनेअंतर्गत मोफत करण्यात आला. त्यामुळे सर्वसामान्य कुटुंबातील रुग्णाला आर्थिक अडचणींचा सामना न करता दर्जेदार आणि तातडीचे उपचार मिळू शकले.

जळगावातील महादेव सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी अचूक निदान, वेळेवर घेतलेला शस्त्रक्रियेचा निर्णय आणि समन्वयपूर्ण उपचारांच्या माध्यमातून ८० वर्षीय वृद्धाला नवजीवन दिले आहे. मेंदूच्या गंभीर आजारावरील अत्याधुनिक उपचार जळगावात उपलब्ध असल्याचे या यशस्वी शस्त्रक्रियेमुळे पुन्हा अधोरेखित झाले आहे.


Protected Content

Play sound