धरणगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे स्मरण करून धरणगाव शहरात त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. हिंदुत्वाची भूमिका, मराठी अस्मिता आणि समाजहितासाठी त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव करत या कार्यक्रमात विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध समाज पंचमंडळांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले. सर्वपक्षीय आणि सर्वसमाजातील मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला व्यापक स्वरूप प्राप्त झाले.
यावेळी उपस्थितांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे स्मरण केले. मराठी माणसाच्या हक्कांसाठी त्यांनी उभारलेला लढा, हिंदुत्वाबाबतची त्यांची ठाम भूमिका आणि सामाजिक क्षेत्रातील योगदान यांचा उल्लेख करून त्यांना अभिवादन करण्यात आले. त्यांच्या विचारांवर श्रद्धा ठेवणारे शिवसैनिक, कार्यकर्ते आणि सामाजिक क्षेत्रातील प्रतिनिधींनी कार्यक्रमात सहभाग नोंदविला.

कार्यक्रमाला धरणगाव तालुका माळी समाज पंचमंडळ, शहर माळीवाडा समाज पंचमंडळ, तिळवन तेली समाज पंचमंडळ, राजपूत समाज पंचमंडळ, भोई समाज पंचमंडळ, पाटील समाज पंचमंडळ, जैन समाज पंचमंडळ, वाणी समाज पंचमंडळ, सोनार समाज पंचमंडळ, अहीर शिंपी समाज तसेच नाभिक समाज पंचमंडळाचे प्रतिनिधी उपस्थित होते. विविध समाजांच्या प्रतिनिधींनी एकत्र येत बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केले. राजकीय क्षेत्रातून भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), अखिल भारतीय काँग्रेस आणि शिवसेनेच्या विविध पदाधिकाऱ्यांनी उपस्थिती लावली. युवा सेनेचे पदाधिकारी तसेच मुस्लिम पंचमंडळाचे प्रतिनिधीही कार्यक्रमात सहभागी झाले होते. नगराध्यक्ष लीलाताई चौधरी, नगरसेवक लक्ष्मण माळी, भारती हेमंत महाजन, ज्योती लक्ष्मण पाटील, प्रमिला शिरसाठ, हेमांगी अग्निहोत्री, परमेश्वर महाजन आणि जितेंद्र धनगर यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
याशिवाय सामाजिक कार्यकर्ते, शिवसैनिक आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर विश्वास ठेवणाऱ्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. विविध राजकीय पक्ष आणि समाजघटकांतील प्रतिनिधी एकाच व्यासपीठावर उपस्थित राहिल्याने कार्यक्रमातून सामाजिक एकोपा आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांप्रती असलेला आदर अधोरेखित झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण अग्निहोत्री यांनी केले. लक्ष्मण पाटील यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाची भूमिका मांडली, तर शहरप्रमुख भागवत चौधरी यांनी उपस्थितांचे आभार मानले.



