Home क्राईम चोपड्यात मध्यरात्री घरफोडीचा प्रयत्न फसला! नागरिकांच्या सतर्कतेमुळे संशयित चोरटा जेरबंद ; दोन...

चोपड्यात मध्यरात्री घरफोडीचा प्रयत्न फसला! नागरिकांच्या सतर्कतेमुळे संशयित चोरटा जेरबंद ; दोन पोलीस कर्मचारी जखमी

0
7

चोपडा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । चोपडा शहरातील श्रीकृष्ण कॉलनीत मध्यरात्री घरफोडी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका संशयिताला नागरिकांच्या सतर्कतेमुळे पोलिसांनी पकडले. मंगळवार, १७ नोव्हेंबर रोजी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. कॉलनीत संशयास्पद हालचाली दिसताच नागरिकांनी आरडाओरड करून इतरांना सावध केले. त्यानंतर नागरिक आणि पोलिसांनी मिळून संशयिताचा पाठलाग केला. यावेळी झालेल्या झटापटीत दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले असून, संशयितालाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, श्रीकृष्ण कॉलनीतील रहिवासी हर्षल मधुकर भोई (वय ३१) हे पंचायत समिती चोपडा येथे सिव्हिल इंजिनीअर म्हणून कार्यरत आहेत. १६ नोव्हेंबर रोजी रात्री सुमारे ८.३० वाजता कार्यालयातील कामकाज आटोपून ते घरी परतले होते. रात्री जेवण केल्यानंतर कुटुंबासह झोपले होते. दरम्यान, १७ नोव्हेंबर रोजी पहाटे २.१५ वाजेच्या सुमारास घराबाहेर काही लोकांचे आवाज ऐकू आल्याने हर्षल भोई यांना जाग आली. त्यांनी खिडकीतून बाहेर पाहिले असता काही इसम कॉलनीत संशयास्पदरीत्या फिरताना दिसले. परिसरातील हालचाली संशयास्पद वाटल्याने त्यांनी तातडीने आरडाओरड करून नागरिकांना सतर्क केले.

त्यांच्या आवाजामुळे कॉलनीतील गोकुळ भगवान न्हावी (वय २५), अर्जुन धनराज पाटील (वय ५०), पंढरीनाथ छन्नू पाटील (वय ६२) आणि भूषण भीमराव पाटील (वय ३४) हे नागरिक तत्काळ घराबाहेर आले. नागरिक बाहेर आल्याचे पाहून संशयित इसमांनी तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. याचदरम्यान रात्री गस्तीवर असलेले चोपडा शहर पोलिसांचे पथकही घटनास्थळी पोहोचले. नागरिक आणि पोलिसांनी संशयितांचा पाठलाग केला असता त्यातील एक जण त्यांच्या हाती लागला. पकडण्यात आलेल्या तरुणाने आपले नाव आशिष शिवा चव्हाण (वय १९, रा. कन्हेरी, ता. उकशी, जि. धार, मध्य प्रदेश) असे सांगितले.

पोलिसांनी त्याला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी झालेल्या झटापटीत पोलीस कर्मचारी अक्षय पाटील यांच्या हनुवटीला मार लागून ते जखमी झाले, तर पोलीस कर्मचारी जगन्नाथ पाटील यांच्या डाव्या हाताला दुखापत झाली. दोन्ही कर्मचाऱ्यांनी संशयिताला पकडण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. घटनेच्या वेळी रात्रगस्त ड्युटीवर असलेले पोलीस निरीक्षक पवन देसले यांनीही परिस्थिती हाताळली. पकडण्यात आलेल्या आशिष चव्हाण याला पोलिसांनी पुढील उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय, चोपडा येथे दाखल केले. जखमी पोलीस कर्मचाऱ्यांवरही उपचार करण्यात आले.

प्राथमिक माहितीनुसार, १७ नोव्हेंबर रोजी पहाटे सुमारे २ वाजता श्रीकृष्ण कॉलनीतील महेंद्र वना पाटील यांच्या बंद घरात आशिष शिवा चव्हाण हा घरफोडी करून चोरी करण्याच्या प्रयत्नात असताना आढळून आला. या प्रकरणी त्याच्याविरुद्ध चोपडा शहर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक यांच्या आदेशाने पोलीस उपनिरीक्षक चेतन परदेशी करीत आहेत. संशयितासोबत अन्य कोणी सहभागी होते का, तसेच परिसरातील इतर संशयास्पद हालचालींशी त्याचा काही संबंध आहे का, याबाबत पोलिसांकडून तपास केला जाण्याची शक्यता आहे.


Protected Content

Play sound