Home Cities धरणगाव जिल्हा बँक निवडणुकीत धरणगाव सोसायटीचा तिढा कायम : तीन नेत्यांच्या प्रतिष्ठेची लढाई

जिल्हा बँक निवडणुकीत धरणगाव सोसायटीचा तिढा कायम : तीन नेत्यांच्या प्रतिष्ठेची लढाई

0
2

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत धरणगाव सोसायटी मतदारसंघातील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. धरणगाव सोसायटीचा तिढा अद्याप सुटलेला नसून, तीन उमेदवार मैदानात उतरल्याने निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे. यात महायुती निश्चीत असून तीनपैकी एका उमेदवारालाच संधी मिळणार असल्याचे स्पष्ट झाल्याने यात कोण बाजी मारणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

धरणगाव विविध कार्यकारी सहकारी संस्था मतदारसंघातून या निवडणुकीत प्रताप गुलाबराव पाटील, संजय मुरलीधर पवार आणि गायत्री भगवान पाटील (महाजन) हे तीन उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. आता अर्ज मागे घेण्यासाठी अवघे दोन दिवस उरले असतांना या मतदारसंघातून कुणाला संधी मिळणार ? याची उत्सुकता लागली आहे.

या लढतीचे विशेष महत्त्व म्हणजे एका बाजूला राज्याचे पाणीपुरवठा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचे पुत्र प्रताप गुलाबराव पाटील, तर दुसऱ्या बाजूला जिल्हा बँकेचे मावळते अध्यक्ष संजय मुरलीधर पवार यांचे पुत्र निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर तिसऱ्या प्रतिस्पर्धी भाजप नेते भगवान महाजन यांच्या सौभाग्यवती आहेत. त्यामुळे या लढतीकडे केवळ सहकारी बँकेची निवडणूक म्हणून नव्हे, तर राजकीय प्रतिष्ठेची लढाई म्हणूनही पाहिले जात आहे.

तिसरीकडे एरंडोल-पारोळा विधानसभा मतदारसंघात आपली राजकीय ताकद सिद्ध केलेले भगवान महाजन यांच्या कुटुंबातील गायत्री भगवान पाटील यांच्या उमेदवारीमुळे या लढतीत आणखी रंगत आली आहे. त्यामुळे तीनही उमेदवारांच्या मागे असलेली राजकीय ताकद आणि मतदारांशी असलेला संपर्क निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.

दरम्यान, राज्याचे पाणीपुरवठा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील नेमकी कोणती भूमिका घेतात, कोणत्या उमेदवाराला पाठिंबा देतात आणि कोणाच्या पारड्यात आपला कौल टाकतात, याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

एकीकडे मंत्रिपुत्राची प्रतिष्ठा, दुसरीकडे माजी चेअरमन जिल्हा बँक सदस्याचा अनुभव, तर तिसरीकडे एरंडोल-पारोळा मतदारसंघातील राजकीय ताकदीचे आव्हान, अशा तिरंगी लढतीत धरणगाव सोसायटीचा गड कोण जिंकणार? पालकमंत्र्यांचा आशीर्वाद कोणाला मिळणार? याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

खरं तर, ही निवडणूक महायुतीच्या माध्यमातूनच लढवली जाणार असल्याचे निश्चीत असले तरी शेवटच्या क्षणाला काहीही घडामोडी होऊ शकतात. महायुती पक्की झाल्यास येथील तीनपैकी दोन उमेदवारांना माघार घ्यावी लागणार ही बाब निश्चीत आहे. यात बिनविरोध निवडीची बाजी कोण मारणार ? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.


Protected Content

Play sound