बोदवड-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शहरात अलीकडच्या काळात वाढलेल्या गुंडगिरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोषाचे वातावरण निर्माण झाले असून, अखेर या संतापाचा उद्रेक भव्य मूक मोर्चाच्या माध्यमातून पाहायला मिळाला. शहरातील बिघडत चाललेली कायदा व सुव्यवस्था सुधारावी, गुंडगिरीला तातडीने आळा घालावा आणि दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, या प्रमुख मागण्यांसाठी शहरातील व्यापारी, शेतकरी, सर्वपक्षीय राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिकांनी एकजूट दाखवत थेट बोदवड पोलीस ठाण्यावर धडक दिली.
या संदर्भातील पार्श्वभूमी पाहता, गत ८ नोव्हेंबर रोजी रात्री शहरातील गांधी चौक परिसरातील अरिहंत ज्वेलर्ससमोर फटाके फोडण्याच्या क्षुल्लक कारणावरून वाद निर्माण झाला होता. या वादाचे पर्यवसान अचानक हाणामारीत झाले. याप्रकरणी संदीप जवरी मिलांदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बोदवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीत नमूद केल्यानुसार, आरोपींनी दगड, फरशीचे तुकडे, लोखंडी पाईप तसेच लोखंडी बोळणीचा वापर करून बेदम मारहाण केली. या भीषण घटनेमध्ये दोन जण गंभीर जखमी झाले असून, या प्रकारामुळे संपूर्ण शहरात भीती आणि संतापाची लाट पसरली आहे.

केवळ ही एकच घटना नसून, शहरात सुरू असलेली अवैध सावकारी, नागरिकांना धमकावण्याचे प्रकार, मारहाण आणि विशेषतः महिलांच्या सुरक्षेशी संबंधित गंभीर प्रश्नांबाबतही मोर्चेकऱ्यांनी चिंता व्यक्त केली. अशा प्रकारच्या सतत घडणाऱ्या घटनांमुळे सर्वसामान्य नागरिक, व्यावसायिक, व्यापारी वर्ग आणि महिलांमध्ये प्रचंड असुरक्षिततेची भावना निर्माण होत असल्याचे नागरिकांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले. शहरातील शांतता आणि सामाजिक सलोखा धोक्यात आला असून, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना पाठीशी न घालता त्यांच्यावर वचक निर्माण करणे गरजेचे असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
या पार्श्वभूमीवर बोदवडमधील व्यापारी, शेतकरी आणि विविध संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने एकत्र आले. पोलीस ठाण्यावर धडकलेल्या या मूक मोर्चादरम्यान पोलीस प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले. शहरातील गुंडगिरीवर तातडीने नियंत्रण आणावे, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या मुसक्या आवळाव्यात आणि नागरिकांना कोणत्याही भीतीशिवाय निर्भयपणे जगता येईल असे पोषक वातावरण निर्माण करावे, अशी आक्रमक परंतु शांततापूर्ण मागणी यावेळी करण्यात आली. शांतताप्रिय समजल्या जाणाऱ्या बोदवड शहरात सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीरपणे ऐरणीवर आला आहे.



