कुर्हे (पानाचे)/भुसावळ-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शाळा ही केवळ शासनाची किंवा शिक्षकांची जबाबदारी नसून संपूर्ण गावाची सामूहिक संपत्ती आहे, या भावनेतून कुर्हे (पानाचे) येथील ग्रामस्थांनी सामाजिक बांधिलकीचा अनोखा आदर्श निर्माण केला आहे. येथील जिल्हा परिषद मराठी शाळेच्या स्वच्छतेसाठी गेल्या दीड महिन्यापासून दर रविवारी युवक आणि ग्रामस्थ स्वयंस्फूर्तीने एकत्र येत श्रमदान करीत आहेत. रविवार, दि. १५ नोव्हेंबर रोजीही ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत शाळा परिसराची स्वच्छता केली.
हातात झाडू, मनात शाळेविषयी जिव्हाळा आणि कृतीतून सामाजिक बांधिलकी जपण्याचा संकल्प अशा भावनेतून हा उपक्रम सुरू आहे. गावातील युवक आणि नागरिक कोणत्याही अपेक्षेशिवाय दर रविवारी एकत्र येऊन शाळा तसेच परिसर स्वच्छ करतात. लोकसहभागातून सुरू असलेल्या या अभियानामुळे शाळेच्या स्वच्छतेसोबतच गावात सामूहिक जबाबदारीची जाणीवही निर्माण होत आहे.

या अभियानात सहभागी झालेले कविवर्य शांतिसुत पी. टी. पाटील यांनी, ‘जिल्हा परिषदेची शाळा माझी आहे आणि तिची साफसफाई मीच करणार!’ असा स्वाभिमानी संदेश दिला. ज्या शाळेत आपल्या मुलांचे भविष्य घडते, त्या शाळेच्या स्वच्छतेसाठी दुसऱ्याची वाट का पाहायची? शाळा ही संपूर्ण गावाची अमूल्य संपत्ती असून तिची काळजी घेणे ही प्रत्येक ग्रामस्थाची जबाबदारी आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. या उपक्रमाची दखल घेत भुसावळ तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी किशोर वायकोळे यांनी दूरध्वनीद्वारे अभियानातील सदस्यांशी संवाद साधला. ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने शाळेच्या स्वच्छतेसाठी पुढाकार घेतल्याबद्दल त्यांनी सर्वांचे विशेष कौतुक व अभिनंदन केले.
या श्रमदान मोहिमेत मुख्याध्यापिका वनिता सोनवणे, शालिनी चौधरी, संतोष तायडे, शारदा मसाने, परदेशी गुरुजी, संतोष चौधरी, अरविंद बावस्कर, योगेश पाटील, श्रीकांत बरकले, प्रमोद उंबरकर, विजय उंबरकर, मधुकर पाटील, कालिदास कळस्कर, गणेश शिंदे, चेतन सपकाळे, सिद्धार्थ पारधी, सिद्धांत बैलम, सुनील जैन, प्रीतम सपकाळे, महेंद्र पाटील, किरण शिंदे, कौतिक बारी, किरण बरकले, रमाकांत रोनखेडे, निलेश डांबरे, अमोल पाटील, डॉ. टी. टी. बारी, अजय पाटील, मोहन पाटील, स्वप्निल पाटील, प्रमोद बारी, लीलाधर पाटील, किशोर शिंदे, किशोर रोनखेडे, बापू नागपुरे आदी ग्रामस्थांनी सहभाग घेतला.



