जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शहरात वीज चोरीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी तब्बल ४० हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून तडजोडीअंती १५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित (महावितरण) च्या एका साहाय्यक अभियंत्यासह दोन वरिष्ठ तंत्रज्ञांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB) च्या पथकाने रंगेहात अटक केली आहे. या धडक कारवाईमुळे महावितरण वर्तुळात एकच खळबळ उडाली असून, भ्रष्ट अधिकाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.
या कारवाईबाबत प्राप्त झालेली सविस्तर माहिती अशी की, तक्रारदार हे जळगाव शहरातील रहिवासी असून, दि. १४ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी महावितरणचे साहाय्यक अभियंता विशाल वसंत नेमाडे (वय ३७, रा. योगेश्वर नगर, जळगाव), वरिष्ठ तंत्रज्ञ भरत कडू तायडे (वय ४५, रा. सावखेदा शिवार, जळगाव) आणि वरिष्ठ तंत्रज्ञ रवींद्र छन्नु पाटील (वय ४१, रा. धरणगाव) या तीन जणांच्या पथकाने तक्रारदार यांच्या घरी भेट दिली होती. यावेळी त्यांच्या घरात नवीन वीज मीटरची पाहणी करून मीटर व घरातील उपकरणांचे फोटो काढण्यात आले. त्यानंतर आरोपींनी तक्रारदाराला पाडे चौक येथे बोलावून घरातील विद्युत उपकरणांचा लोड जास्त असल्याचे व सर्विस वायर बायपास करून वीज चोरी होत असल्याचे सांगितले.
ही वीज चोरीची कारवाई टाळण्यासाठी आणि गुन्हा दाखल न करण्यासाठी सुरुवातीला आरोपींनी ४० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. मात्र, तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB), जळगाव कार्यालय गाठून औपचारिक तक्रार नोंदवली. या तक्रारीच्या अनुषंगाने एसीबीच्या पथकाने २१ नोव्हेंबर २०२६ रोजी पंचांसमक्ष लाचेच्या मागणीची पडताळणी केली. पडताळणी दरम्यान आरोपींनी तडजोडीअंती १५ हजार रुपयांची रक्कम स्वीकारण्याचे मान्य केले.
त्यानुसार, ठरलेल्या पंचांसमक्ष जळगावातील पाडे चौक परिसरात सापळा रचण्यात आला. यावेळी आरोपींनी तक्रारदाराकडून १५ हजार रुपयांची लाचलुचपत रक्कम स्वीकारताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यांना रंगेहात पकडले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची कायदेशीर प्रक्रिया सुरू असून, आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.
सदर यशस्वी कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगावच्या पोलीस निरीक्षक रेश्मा अवताहरे, पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोहवा बाळू मराठे, पोकों राकेश दुसाने आणि पोकों मनाज पाटील यांच्या पथकाने पार पाडली. या कारवाईमुळे महावितरणमधील लाचखोर कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.



