जळगाव। लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त जळगाव शहरात आदिवासी विकास विभागाच्या वतीने भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागांतर्गत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावल यांच्या पुढाकाराने आयोजित या रॅलीत मोठ्या संख्येने आदिवासी बांधव सहभागी झाले. पारंपरिक वेशभूषा, नृत्य आणि उत्साहपूर्ण वातावरणामुळे संपूर्ण परिसरात आदिवासी संस्कृतीचा जागर पाहायला मिळाला.
रविवारी (१५ नोव्हेंबर) सकाळी छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण अर्थात जी.एस. ग्राउंड येथून या रॅलीला सुरुवात झाली. जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या या रॅलीच्या माध्यमातून भगवान बिरसा मुंडा यांच्या विचारांना अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. रॅलीच्या सुरुवातीला आदिवासी बांधवांनी सादर केलेल्या पारंपरिक नृत्याने उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेतले. पारंपरिक वाद्यांच्या तालावर सादर झालेल्या नृत्यातून आदिवासी समाजाची समृद्ध परंपरा, सांस्कृतिक वारसा आणि एकजुटीचे दर्शन घडले. या सादरीकरणामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली. रॅलीत सहभागी झालेल्या आदिवासी बांधवांनी उत्साहाने सहभाग नोंदवत भगवान बिरसा मुंडा यांच्या कार्याचा आणि विचारांचा जागर केला.

या प्रसंगी खासदार स्मिता वाघ, आमदार राजूमामा भोळे, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प संचालक अरुण पवार, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजीव लोखंडे, अपर जिल्हाधिकारी श्रीमंत हारकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. भगवान बिरसा मुंडा यांनी आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी, स्वाभिमानासाठी आणि स्वातंत्र्यासाठी दिलेला लढा आजही प्रेरणादायी मानला जातो. त्यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या रॅलीतून त्यांच्या संघर्षमय जीवनकार्याचे स्मरण करण्यासोबतच आदिवासी समाजाची अस्मिता, संस्कृती आणि परंपरा जपण्याचा संदेश देण्यात आला.



