यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात आदिवासी समाजाने दिलेले योगदान अत्यंत मोलाचे असून भगवान बिरसा मुंडा आणि क्रांतिवीर ख्वाजाजी नाईक यांच्यासारख्या शूर महापुरुषांच्या त्यागाचा व स्वाभिमानाचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी धरणगाव येथे केले. ‘जनजातीय गौरव सेवा सप्ताहा’च्या निमित्ताने क्रांतीवीर ख्वाजाजी नाईक स्मारक परिसरात आयोजित स्वच्छता अभियान, नेत्रदीपक दीपोत्सव आणि सांस्कृतिक कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
या कार्यक्रमाची सुरुवात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून आणि क्रांतीवीर ख्वाजाजी नाईक यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावल यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात स्मारक परिसरात स्वच्छता अभियान राबवल्यानंतर आकर्षक विद्युत रोषणाईमुळे केलेला दीपोत्सव अत्यंत आकर्षक ठरला. यावेळी बोलताना पालकमंत्री पाटील म्हणाले की, आदिवासी समाजाच्या शैक्षणिक प्रगतीसाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून दरवर्षी सुमारे १६ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जातो. विद्यार्थ्यांमधील शिक्षणाची ओढ वाढीस लावण्यासाठी आणि आदिवासी पाड्यांवरील पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी पाणीपुरवठा योजनांना व सौरऊर्जीकरणाला प्राधान्य दिले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
याप्रसंगी मार्गदर्शन करताना खासदार स्मिताताई वाघ यांनी सांगितले की, भगवान बिरसा मुंडा व क्रांतीवीर ख्वाजाजी नाईक यांचा संघर्ष प्रेरणादायी असून विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या जोरावर स्वतःची प्रगती साधून समाजाची उन्नती करावी. प्रास्ताविकात प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांनी सप्ताहातील विविध उपक्रमांची माहिती दिली, तर विद्यापीठाच्या पथकानी सादर केलेल्या पथनाट्याने उपस्थितांची मने जिंकली. या सोहळ्यास खासदार स्मिताताई वाघ, पी. सी. पाटील, सविताताई सोनवणे, लीलाताई चौधरी, भाईदास सोनवणे, सुभाषअण्णा पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि मोठ्या संख्येने आदिवासी बांधव उपस्थित होते.



