जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मध्य प्रदेशातील खरगोन येथे झालेल्या भूकंपाचे धक्के जळगाव जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रातील काही भागांत जाणवल्याच्या पार्श्वभूमीवर, जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी नागरिकांना घाबरून न जाता संयम बाळगण्याचे आणि सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. शनिवार, दि. १४ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ९ वाजून १६ मिनिटांच्या सुमारास मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यात ४.५ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला, ज्याचे सौम्य धक्के जळगाव जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत नागरिकांना जाणवले. या घटनेनंतर प्रशासनाने तात्काळ दखल घेत संपूर्ण परिस्थितीवर लक्ष केंद्रित केले असून, सुदैवाने जिल्ह्यात कुठेही जीवित किंवा वित्तहानी झाल्याची प्राथमिक माहिती नाही, अशी माहिती पालकमंत्र्यांनी दिली आहे.
या भूकंपाचे धक्के जळगाव जिल्ह्याशिवाय धुळे, नंदुरबार, अमरावती आणि बुलढाणा जिल्ह्यांतील काही भागांतही जाणवले आहेत. जळगाव जिल्ह्यातील विविध तालुक्यांत सौम्य स्वरूपाचे हादरे बसल्यामुळे नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, प्रशासनाकडून तात्काळ यंत्रणा कामाला लावण्यात आली असून, आतापर्यंत कोणत्याही प्रकारच्या नुकसानीची नोंद झालेली नाही. प्रत्येक नागरिकाची सुरक्षितता ही शासनासाठी सर्वोच्च प्राथमिकता असून, कोणत्याही अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये, असे स्पष्ट निर्देश पालकमंत्र्यांनी दिले आहेत.
कोणत्याही आपत्कालीन किंवा संकट समयी शासन आणि प्रशासन जिल्हावासीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे. जर कोणाच्या भागात भूकंपामुळे घराचे किंवा इतर कोणतेही नुकसान झाले असल्याचे निदर्शनास आले, तर नागरिकांनी तत्काळ संबंधित तहसील कार्यालय, स्थानिक पोलीस किंवा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. प्राप्त माहितीच्या आधारे प्रशासनाने तातडीने परिस्थितीचा आढावा घेऊन बाधित भागांना आवश्यक ती मदत उपलब्ध करून द्यावी, असे निर्देशही प्रशासनाला देण्यात आले आहेत. नैसर्गिक आपत्तीच्या या प्रसंगी नागरिकांनी घाबरून न जाता धैर्याने वागावे आणि एकमेकांना सहकार्य करावे, असे आवाहन करत जिल्हावासीयांच्या सुरक्षिततेसाठी शासन सदैव तत्पर असल्याचे त्यांनी शेवटी स्पष्ट केले.



