Home क्राईम रेल्वे उड्डाणपुलाच्या २५ फुटी खड्ड्यात पडून तरुणाचा मृत्यू ; खडकदेवळा ग्रामस्थांचे घटनास्थळी...

रेल्वे उड्डाणपुलाच्या २५ फुटी खड्ड्यात पडून तरुणाचा मृत्यू ; खडकदेवळा ग्रामस्थांचे घटनास्थळी आंदोलन

0
1

पाचोरा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । पाचोरा-बोदवड ब्रॉडगेज रेल्वे मार्गावरील गोराडखेडा गावाजवळ सुरू असलेल्या रेल्वे उड्डाणपुलाच्या बांधकामस्थळी खोदण्यात आलेल्या सुमारे २५ फुट खोल खड्ड्यात पडून खडकदेवळा येथील तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेला जबाबदार असलेल्या संबंधित बांधकाम कंपन्या आणि त्यांच्या जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी १३ नोव्हेंबर रोजी खडकदेवळा ग्रामस्थांनी घटनास्थळी आंदोलन केले. मृत तरुणाला न्याय मिळावा आणि भविष्यात अशा दुर्घटना घडू नयेत, यासाठी ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

खडकदेवळा, ता. पाचोरा येथील रहिवासी विकी संजय निकम हा ३० ऑक्टोबर २०२६ रोजी जळगाव येथून आपल्या गावाकडे परत येत होता. यावेळी गोराडखेडा गावाजवळ पाचोरा-बोदवड रेल्वे मार्गावरील उड्डाणपुलाचे बांधकाम सुरू होते. या बांधकामासाठी संबंधित ठिकाणी मोठा खड्डा खोदण्यात आला होता. मात्र, घटनास्थळी पुरेशी अपघात प्रतिबंधक व्यवस्था, सुरक्षिततेचे उपाय किंवा धोक्याची सूचना देणारे फलक लावण्यात आले नसल्याचा आरोप मृत तरुणाच्या नातेवाइकांनी केला आहे.

रात्रीच्या अंधारात रस्ता स्पष्टपणे दिसत नसल्याने विकी निकम याची दुचाकी अथवा वाहनासह २५ फुट खोल खड्ड्यात पडून दुर्घटना घडल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या भीषण अपघातात विकी निकम याचा जागीच मृत्यू झाला, तर त्याच्यासोबत असलेला सहकारी गंभीर जखमी झाला. या घटनेमुळे खडकदेवळा गावावर शोककळा पसरली असून ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. या दुर्घटनेला बांधकामस्थळी आवश्यक सुरक्षा व्यवस्था न केल्याचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. सोनाई इन्फ्रा, पुणे आणि अशोका बिल्डकॉन लिमिटेड, नाशिक या संबंधित कंपन्यांसह बांधकामाच्या ठिकाणी कार्यरत असलेल्या जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

मयत विकी निकम यांचे मामा समाधान शिंपी यांच्या मार्गदर्शनाखाली १३ नोव्हेंबर रोजी दुर्घटनास्थळी आंदोलन करण्यात आले. यावेळी खडकदेवळा येथील शेकडो ग्रामस्थ सहभागी झाले होते. मृत तरुणाच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा, संबंधित दोषींवर तातडीने कारवाई व्हावी आणि बांधकामस्थळी सुरक्षेच्या नियमांचे पालन करण्यात यावे, अशा मागण्या आंदोलनकर्त्यांनी केल्या. आंदोलनानंतर ग्रामस्थांच्या वतीने पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनावर शेकडो ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या असल्याचे सांगण्यात आले. संबंधित कंपन्या आणि जबाबदार अधिकारी-कर्मचाऱ्यांवर तातडीने कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी खोल खड्डे खोदलेले असताना रात्रीच्या वेळी पुरेशी प्रकाशव्यवस्था, बॅरिकेडिंग, धोक्याचे फलक आणि वाहनचालकांना सुरक्षित मार्गदर्शन करणारी यंत्रणा असणे आवश्यक आहे. मात्र, या ठिकाणी अशा उपाययोजना करण्यात आल्या होत्या की नाहीत, याची सखोल चौकशी होणे गरजेचे असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.


Protected Content

Play sound