जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । स्वतंत्र भारताचे पहिले केंद्रीय शिक्षणमंत्री, भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने अभिवादन करण्यात आले. बुधवार, ११ नोव्हेंबर रोजी आकाशवाणी चौकातील जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.
अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष मजहरभाई पठाण आणि महानगर जिल्हाध्यक्ष अशोक लाडवंजारी यांच्या हस्ते मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा कार्यालय सरचिटणीस वाय. एस. महाजन यांनी मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले की, मौलाना अबुल कलाम आझाद यांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्यात मोलाचे योगदान दिले. ते महान विचारवंत, थोर शिक्षणतज्ज्ञ आणि स्वतंत्र भारताचे पहिले केंद्रीय शिक्षणमंत्री होते. देशाच्या शैक्षणिक आणि सामाजिक जडणघडणीत त्यांचे योगदान ऐतिहासिक आहे.

१० ऑगस्ट १९४२ ते १७ एप्रिल १९४५ या कालावधीत मौलाना आझाद अहमदनगरच्या तुरुंगात होते. स्वातंत्र्यलढ्यातील त्यांचा त्याग, संघर्ष आणि देशाप्रती असलेली निष्ठा सदैव स्मरणात राहील, असेही महाजन यांनी सांगितले. शिक्षण हे समाजाच्या प्रगतीचे आणि सशक्त राष्ट्रनिर्मितीचे प्रभावी साधन आहे, हा मौलाना आझाद यांचा विचार आजही तितकाच महत्त्वाचा आहे. शिक्षण, सामाजिक एकता, बंधुभाव आणि सर्वधर्मसमभावाचा संदेश समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
या कार्यक्रमाला महानगर जिल्हा कार्याध्यक्ष राजु मोरे, राष्ट्रवादी काँग्रेस युवक प्रदेश सरचिटणीस रमेश पाटील, महानगर जिल्हा उपाध्यक्ष किरण राजपूत, गणेश पाटील, महानगर युवक जिल्हा उपाध्यक्ष रफीक पटेल, राजु बाविस्कर यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार महानगर जिल्हा कार्यालय सरचिटणीस सुनील माळी यांनी मानले.