Home Cities चोपडा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी चोपड्यात दोन्ही बहिणींच्या घरी जाऊन साजरी केली भाऊबीज ; बहिणींना दिली प्रेमाची भेट

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी चोपड्यात दोन्ही बहिणींच्या घरी जाऊन साजरी केली भाऊबीज ; बहिणींना दिली प्रेमाची भेट

0
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी चोपड्यात दोन्ही बहिणींच्या घरी जाऊन साजरी केली भाऊबीज ; बहिणींना दिली प्रेमाची भेट

चोपडा/जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । राजकारणातील मोठे पद, वाढलेल्या जबाबदाऱ्या आणि व्यस्त दिनक्रम… मात्र या सगळ्यापलीकडे जाऊन रक्ताच्या नात्यांमधील प्रेम जपणारी माणसे नेहमीच वेगळी ठरतात. राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी याच नात्यांचा जिव्हाळा जपत चोपडा येथे आपल्या दोन्ही बहिणींच्या घरी जाऊन भाऊबीज साजरी केली. बहिणींचे प्रेमळ औक्षण स्वीकारत त्यांनी त्यांना भाऊबीजेची भेट दिली. मंत्रीपदाचा मोठेपणा बाजूला ठेवून बहिणींसाठी आजही तेच लाडके गुलाबभाऊ असल्याचा हृदयस्पर्शी प्रत्यय या भेटीतून आला.

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना तीन बहिणी असून, त्यापैकी सौ. निर्जलाताई देशमुख आणि सौ. सुशीलाताई गुजर या चोपडा येथे वास्तव्यास आहेत. रक्षाबंधनाच्या सणालाही गुलाबभाऊ यांनी दोन्ही बहिणींच्या घरी जाऊन त्यांच्या हातून राखी बांधून घेतली होती. आता भाऊबीजेच्या निमित्तानेही त्यांनी आवर्जून बहिणींच्या घरी भेट दिली. बहिणींच्या हातून औक्षण करून घेत त्यांच्याशी आपुलकीने संवाद साधला आणि प्रेमाची भेट देत सणाचा आनंद द्विगुणित केला.

राजकीय आणि प्रशासकीय कामांचा व्याप मोठा असतानाही कौटुंबिक नात्यांसाठी वेळ काढण्याची त्यांची ही कृती विशेष लक्षवेधी ठरली. सार्वजनिक जीवनात हजारो कार्यकर्ते आणि नागरिकांशी जिव्हाळ्याचे संबंध जपणारे गुलाबराव पाटील आपल्या बहिणींसाठी मात्र आजही तितकेच प्रेमळ आणि मायेचे भाऊ आहेत. पद, प्रतिष्ठा आणि राजकारण यापलीकडे जाऊन नात्यांमधील आपुलकी जपण्याचा त्यांचा स्वभाव या निमित्ताने पुन्हा एकदा समोर आला.

रक्षाबंधन असो किंवा भाऊबीज, बहीण-भावाच्या नात्यातील प्रेम, विश्वास आणि एकमेकांच्या सुख-दुःखात सोबत राहण्याची भावना या सणांमधून अधिक दृढ होत असते. बहिणींच्या घरी स्वतः जाऊन सण साजरा करण्याच्या गुलाबराव पाटील यांच्या कृतीतूनही हीच भावनिक बांधिलकी दिसून आली. त्यांच्या या भेटीमुळे दोन्ही बहिणींच्या कुटुंबात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. यावेळी नगरसेवक आबा पदेशमुख, भैया पवार, राजाराम पाटील, अशोक पाटील, भरत देशमुख, नवलराजे पाटील यांच्यासह दोन्ही बहिणींच्या परिवारातील सदस्य उपस्थित होते.