Home धर्म-समाज फैजपूरच्या विठ्ठल मंदिरात दिवाळी पाडव्याला छप्पन्न भोगांचा अन्नकूट महोत्सव उत्साहात

फैजपूरच्या विठ्ठल मंदिरात दिवाळी पाडव्याला छप्पन्न भोगांचा अन्नकूट महोत्सव उत्साहात

0
फैजपूरच्या विठ्ठल मंदिरात दिवाळी पाडव्याला छप्पन्न भोगांचा अन्नकूट महोत्सव उत्साहात

फैजपूर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | येथील श्री विठ्ठल मंदिरात कार्तिक मासानिमित्त दररोज पहाटे ५ ते ७ या वेळेत काकडा आरतीचे आयोजन करण्यात येत आहे. या आरतीला दररोज मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहत असून, युवकांचाही उत्स्फूर्त सहभाग लाभत आहे. काकडा भजनाच्या सुरांनी मंदिर परिसर भक्तिरसात न्हाऊन निघत आहे.

 

वारकरी संप्रदायाची अनेक वर्षांपासून सुरू असलेली ही धार्मिक परंपरा आजही तितक्याच श्रद्धेने आणि उत्साहाने जपली जात आहे. विशेषतः नव्या पिढीतील युवकांचा वाढता सहभाग ही समाधानाची बाब असल्याचे मत डिंगबर महाराज चिनावलकर मठ संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र नारखेडे यांनी व्यक्त केले.

या धार्मिक उपक्रमाच्या नियोजनासाठी मंदिर व्यवस्थापनाच्या वतीने नरेंद्र महाजन, नामदेव भंगाळे, हेमंत भंगाळे आणि राजेंद्र भंगाळे यांनी विशेष परिश्रम घेतले. काकडा भजनासाठी गायक किशोर शेठ कासार, लक्ष्मण पाचपांडे, विक्रांत नरेंद्र नारखेडे, मयूर नरेंद्र नारखेडे आणि राहुल साळी सेवा देत आहेत. तर मृदंग वादनासाठी भूषण प्रभाकर नारखेडे, सी. के. चौधरी, विलास नेमाडे, सुधाकर भारंबे, सुनील नारखेडे आणि किरण चौधरी यांच्यासह महिला मंडळाचेही योगदान लाभत आहे.

दरम्यान, दिवाळी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर मंदिरात छप्पन्न भोगांचा भव्य अन्नकूट महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी भगवान श्री विठ्ठल-रुक्मिणी यांना छप्पन्न भोगांचा नैवेद्य अर्पण करण्यात आला. त्यानंतर उपस्थित भाविकांना प्रसादाचे भक्तिभावाने वाटप करण्यात आले.

काकडा आरती, भजन आणि अन्नकूट महोत्सवामुळे विठ्ठल मंदिर परिसरात भक्तिमय व मंगलमय वातावरण निर्माण झाले आहे. या उपक्रमातून वारकरी संप्रदायाची धार्मिक परंपरा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचे कार्य होत आहे.