फैजपूर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | अल्पसंख्याक समाजासाठी शासनाकडून विविध कल्याणकारी योजना राबविल्या जात असल्या, तरी त्यांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत नसल्याचा मुद्दा उपस्थित करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाने आक्रमक भूमिका घेतली आहे. रावेर लोकसभा जिल्हाध्यक्ष शेख कुर्बान हाजी अब्दुल करीम यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासह विविध उपाययोजनांची मागणी केली आहे.
अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती, शिक्षण, आरोग्य, रोजगार, स्वयंरोजगार आणि मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाच्या योजनांचा लाभ पात्र नागरिकांना मिळावा, अशी मागणी करण्यात आली आहे. योजनांची माहिती नसणे, प्रशासकीय दिरंगाई आणि आवश्यक कागदपत्रांसाठी होणारी धावपळ यामुळे अनेक लाभार्थी वंचित राहत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांची विशेष आढावा बैठक आयोजित करावी, प्रत्येक तालुक्यात जनजागृती शिबिरे घ्यावीत, जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतंत्र हेल्पडेस्क सुरू करावा आणि योजनांचा लाभ न मिळाल्यास संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करावी, अशा चार प्रमुख मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत.
याशिवाय उत्पन्न व रहिवासी दाखल्यांसाठी विशेष शिबिरे आयोजित करणे, बेरोजगार तरुणांना कर्ज योजनांसाठी मार्गदर्शन करणे आणि वक्फ मालमत्तांचे संरक्षण करण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेण्याची मागणीही करण्यात आली आहे.
केवळ कागदोपत्री योजना जाहीर न करता त्यांचा प्रत्यक्ष लाभ गरजूंच्या घरापर्यंत पोहोचवावा, अशी भूमिका शेख कुर्बान यांनी मांडली. निवेदनाच्या प्रती विभागीय आयुक्त, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा अल्पसंख्याक अधिकारी यांनाही देण्यात आल्या आहेत.