जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । दिवाळी म्हटली की आकाशकंदील, फराळ, फटाके आणि लहान मुलांनी साकारलेले गडकिल्ले डोळ्यांसमोर येतात. आधुनिक तंत्रज्ञान आणि मोबाईलच्या वाढत्या आकर्षणाच्या काळात जळगाव येथील अवघ्या चार वर्षांच्या शार्वी शिवाजी पाटील हिने मातीपासून सुंदर आणि आकर्षक किल्ला साकारत पारंपरिक संस्कृतीचा वारसा जपला आहे. तिच्या या कलाकृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
शार्वी शिवाजी पाटील ही सेंट जोसेफ स्कूल, जळगाव येथे शिक्षण घेत आहे. २६ फेब्रुवारी २०२२ रोजी जन्मलेल्या शार्वीने एवढ्या कमी वयात आपल्या कल्पकतेची आणि कलागुणांची अनोखी झलक दाखवून दिली आहे. तिने स्वतःच्या हाताने माती मळून त्यापासून किल्ल्याची आकर्षक प्रतिकृती तयार केली आहे.

या किल्ल्यामध्ये तटबंदी, बुरूज, पायऱ्या आणि तोफ अशा विविध ऐतिहासिक रचनांचा समावेश करण्यात आला आहे. किल्ल्याची रचना करताना शार्वीने दाखवलेली बारकाई, कल्पकता आणि मेहनत विशेष लक्षवेधी ठरत आहे. अवघ्या चार वर्षांच्या चिमुकलीने स्वतःच्या हातांनी साकारलेला हा मातीचा किल्ला पाहणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांचा इतिहास आणि त्यांच्याविषयीचे प्रेम बालवयातच मुलांमध्ये रुजावे, यासाठी दिवाळीत किल्ले बनवण्याची परंपरा महत्त्वाची मानली जाते. शार्वीनेही या परंपरेत उत्साहाने सहभाग घेत मातीशी नाते जोडले आहे. मोबाईल आणि डिजिटल मनोरंजनाच्या वाढत्या प्रभावाच्या काळात तिने मातीत रमून आपली कल्पनाशक्ती आणि सर्जनशीलता व्यक्त केली आहे.
शार्वीच्या या छोट्याशा प्रयत्नातून मोठा सांस्कृतिक संदेश मिळत असून, तिचे आई-वडील, शिक्षक आणि परिसरातील नागरिकांकडून विशेष कौतुक केले जात आहे. तिच्या कलागुणांना प्रोत्साहन देत सर्वांनी तिच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.