यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) राज्यातील लाखो महिला प्रवाशांना मोठा दिलासा दिला आहे. एसटीच्या सवलतीच्या तिकिटांसाठी अनिवार्य करण्यात आलेल्या नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (NCMC) ची अट ७ नोव्हेंबर २०२६ ते ३१ डिसेंबर २०२६ या कालावधीसाठी शिथिल करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. त्यामुळे या कालावधीत महिला लाभार्थ्यांना NCMC कार्ड नसतानाही एसटीच्या प्रवासात मिळणाऱ्या अर्ध्या तिकिटाच्या सवलतीचा लाभ घेता येणार आहे.
राज्य परिवहन महामंडळाने १ ऑक्टोबर २०२६ पासून महिला प्रवाशांना तसेच ज्येष्ठ नागरिकांना सवलतीचे तिकीट मिळविण्यासाठी NCMC कार्ड अनिवार्य केले होते. मात्र, या निर्णयानंतर राज्यातील अनेक महिला लाभार्थ्यांची अद्याप कार्ड नोंदणी आणि वितरण प्रक्रिया पूर्ण झालेली नसल्याचे निदर्शनास आले. विशेषतः ग्रामीण आणि दुर्गम भागातील महिलांना या कार्डाबाबत पुरेशी माहिती नसल्याने मोठ्या संख्येने महिला नोंदणीपासून वंचित राहिल्या होत्या. महामंडळाच्या माहितीनुसार, आतापर्यंत राज्यात केवळ १.१० कोटी NCMC कार्डांची नोंदणी अथवा वितरण झाले आहे. महिला लाभार्थ्यांची मोठी संख्या लक्षात घेता सर्व महिलांपर्यंत कार्ड पोहोचविण्यासाठी आणखी वेळ देण्याची आवश्यकता असल्याचे महामंडळाच्या निदर्शनास आले. त्यामुळे महिलांच्या प्रवासातील सवलत कायम ठेवत NCMC कार्डाची अनिवार्यता तात्पुरती शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

यासंदर्भात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या महाव्यवस्थापक (वाहतूक) यांनी ४ नोव्हेंबर २०२६ रोजी पत्र जारी केले आहे. त्यानुसार ७ नोव्हेंबरपासून ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत महिला लाभार्थ्यांना NCMC कार्डाच्या अटीशिवाय एसटीच्या प्रवासातील अर्ध्या तिकिटाची सवलत घेता येणार आहे. या निर्णयामुळे दिवाळीच्या काळात गावी जाणाऱ्या तसेच नातेवाईकांकडे प्रवास करणाऱ्या महिलांना मोठा फायदा होणार आहे. दरम्यान, ही सवलत तात्पुरती असून या कालावधीत सर्व महिला लाभार्थ्यांनी NCMC कार्डाची नोंदणी पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन महामंडळाने केले आहे. यासाठी केवळ शहरांपुरते मर्यादित न राहता ग्रामपंचायत स्तरापर्यंत विशेष शिबिरे आयोजित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या विशेष शिबिरांमध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रवासी संघटना आणि ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचा सक्रिय सहभाग घेण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. ग्रामीण भागातील महिलांना कार्ड नोंदणी आणि वितरणाची सुविधा सहज उपलब्ध व्हावी, हा या मोहिमेमागील मुख्य उद्देश आहे. ३१ डिसेंबर २०२६ अखेर राज्यातील १०० टक्के पात्र महिला लाभार्थ्यांची NCMC कार्ड नोंदणी व वितरण पूर्ण करण्याचे उद्दिष्ट महामंडळाने निश्चित केले आहे.



