Home क्रीडा गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात तलवारबाजी स्पर्धेत खेळाडूंची सुवर्णपदकांची कमाई 

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात तलवारबाजी स्पर्धेत खेळाडूंची सुवर्णपदकांची कमाई 

0
2

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । गोदावरी फाउंडेशन संचलित गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे यांच्या सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षातील आंतरविभागीय तलवारबाजी स्पर्धा उत्साहात पार पडली. या स्पर्धेत गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या खेळाडूंनी दमदार कामगिरी करत सुवर्ण, रौप्य आणि कांस्यपदकांची लयलूट केली. विशेष म्हणजे, स्पर्धेतील कामगिरीच्या आधारे निवड झालेले खेळाडू जम्मू-काश्मीर येथे होणाऱ्या अखिल भारतीय तलवारबाजी स्पर्धेत विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करणार आहेत.

या स्पर्धेत विद्यापीठांतर्गत विविध महाविद्यालयांमधील सुमारे ३० पुरुष आणि २५ महिला खेळाडूंनी सहभाग नोंदवला. पुरुष आणि महिला अशा दोन्ही गटांत सेबर, एपी आणि फॉइल या तीन प्रकारांत चुरशीचे सामने रंगले. खेळाडूंनी कौशल्य, चपळाई आणि उत्कृष्ट तंत्राच्या जोरावर प्रतिस्पर्ध्यांना आव्हान देत आपली गुणवत्ता सिद्ध केली. स्पर्धेचे उद्घाटन ई अँड टी विभागप्रमुख डॉ. हेमंत इंगळे, डॉ. तुषार कोळी (अधिष्ठाता), प्रा. मुकुंद शिरसाठ, प्रा. मनोज राठोड आणि एनआयएस फेन्सिंग प्रशिक्षक पायल मोरकर यांच्या उपस्थितीत झाले. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि सरस्वती पूजन करून स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. यावेळी डॉ. हेमंत इंगळे यांनी खेळाचे महत्त्व विशद करताना सांगितले की, खेळातून केवळ पदके किंवा विजय मिळत नाही, तर व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो. तसेच जीवनातील विविध आव्हानांना सामोरे जाण्याची क्षमता निर्माण होते.

स्पर्धेच्या निकालात सेबर पुरुष गटात गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या तेजस पाटील याने सुवर्णपदक पटकावले. महिला गटात सायली पाटील हिने सुवर्णपदक, तर साक्षी उबाळे हिने कांस्यपदक मिळवले. एपी पुरुष गटात डॉ. व्ही. के. पाटील सीओईटी, छत्रपती संभाजीनगर येथील सिद्धांत विधाते याने सुवर्णपदक मिळवले, तर गोदावरीच्या मयूर कोळी याने रौप्यपदकावर नाव कोरले. एपी महिला गटात गोदावरीच्या वैष्णवी साबळे हिने रौप्यपदक पटकावले. फॉइल पुरुष गटात सिद्धार्थ विधाते याने सुवर्णपदक मिळवले, तर गोदावरीच्या तुषार पाटील याने कांस्यपदकाची कमाई केली. फॉइल महिला गटात गोदावरीच्या सोनम गुंजाळ हिने सुवर्णपदक, तर निसर्गा पाटील हिने कांस्यपदक पटकावत महाविद्यालयाच्या यशात मोलाची भर घातली.

या स्पर्धेतील खेळाडूंच्या कामगिरीच्या आधारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या संघासाठी विविध खेळाडूंची निवड करण्यात आली. पुरुष राखीव गटात एपी प्रकारासाठी शिवराज भोसले (एमजीएम, नांदेड), फॉइल प्रकारासाठी अंकुश सामुद्रे (डी. एन. पटेल, शहादा) आणि सेबर प्रकारासाठी दत्ता कपाटे (एमजीएम, नांदेड) यांची निवड झाली. महिला राखीव गटात एपी प्रकारासाठी गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विशाखा सुरवाडे, फॉइल प्रकारासाठी रोशनी सूर्यवंशी आणि सेबर प्रकारासाठी कृपा सूर्यवंशी (डी. एन. पटेल, शहादा) यांची निवड करण्यात आली. निवड झालेले खेळाडू जम्मू-काश्मीर येथे आयोजित अखिल भारतीय तलवारबाजी स्पर्धेत विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करणार असल्याने महाविद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील यशात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

स्पर्धेचा समारोप पारितोषिक वितरण समारंभाने झाला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांच्या प्रेरणा आणि मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. क्रीडा संचालक डॉ. जयंत जाधव आणि प्रा. नकुल गाडगे यांनी स्पर्धेच्या नियोजनासाठी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी राजश्री यादव हिने केले. गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या खेळाडूंनी मिळवलेल्या या उल्लेखनीय यशाबद्दल गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, सदस्य डॉ. केतकी पाटील, डॉ. वैभव पाटील आणि डॉ. अनिकेत पाटील यांनी सर्व पदकविजेत्या व सहभागी खेळाडूंचे अभिनंदन केले. तसेच अखिल भारतीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या खेळाडूंना पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.


Protected Content

Play sound