जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी गुरुवारी, ५ नोव्हेंबर रोजी भुसावळ तालुक्याचा दौरा करून पंचायत समिती सभागृहात विविध विकासकामांची सविस्तर आढावा बैठक घेतली. ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांशी थेट निगडित असलेल्या योजनांना गती देणे आणि आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने त्यांनी हा दौरा केला. या बैठकीत पंचायत समितीचे अधिकारी, विस्तार अधिकारी तसेच सर्व ग्रामसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आढावा बैठकीदरम्यान मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी ग्रामीण भागातील घरकुल योजनांची सद्यस्थिती, प्रलंबित घरकुलांची कामे आणि जलतारा उपक्रमाची अंमलबजावणी यावर सविस्तर चर्चा केली. सर्व पात्र लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ विनाविलंब मिळायला हवा, असे ठामपणे सांगत त्यांनी प्रलंबित कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्याचे कडक निर्देश दिले. सर्व संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपापसांत योग्य समन्वय ठेवून कामाचा निपटारा करावा, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
बैठकीनंतर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी नशिराबाद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास अचानक भेट देऊन पाहणी केली. पाहणीदरम्यान आरोग्य केंद्रातील स्वच्छता, औषधांची उपलब्धता आणि रुग्णांना मिळणाऱ्या वैद्यकीय सुविधांचा त्यांनी प्रत्यक्ष आढावा घेतला. आरोग्य केंद्राचा परिसर स्वच्छ ठेवण्याला प्राधान्य देत रुग्णांना दर्जेदार व तत्पर आरोग्य सेवा पुरवण्याचे स्पष्ट निर्देश त्यांनी उपस्थित वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिले.
ग्रामीण भागातील विकासकामांची गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि तळागाळातील नागरिकांना प्रशासकीय सेवा सुरळीत मिळण्यासाठी प्रत्यक्ष क्षेत्रीय स्तरावर जाऊन पाहणी करण्यावर करिश्मा नायर यांनी विशेष भर दिला आहे. त्यांच्या या दौऱ्यामुळे भुसावळ तालुक्यातील पंचायत समिती प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा पूर्णपणे ॲक्शन मोडवर आली असून प्रलंबित कामांना गती मिळण्याची आशा व्यक्त केली जात आहे.




