Home क्राईम पारोळा रथोत्सवातील सोनसाखळी चोरीचा छडा ; बीडमधून आरोपीला अटक, ६.११ लाखांचे दागिने...

पारोळा रथोत्सवातील सोनसाखळी चोरीचा छडा ; बीडमधून आरोपीला अटक, ६.११ लाखांचे दागिने जप्त

0
11

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । पारोळा येथील रथोत्सवातील गर्दीचा फायदा घेऊन सोन्याचे दागिने चोरणाऱ्या आरोपीला जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बीड येथून अटक केली आहे. गणेश कचरू पवार (वय ४०, रा. अयोध्यानगर, बहिरवाडी, बीड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, त्याच्याकडून चोरीस गेलेले ४७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, एकूण ६ लाख ११ हजार रुपये किमतीचे, हस्तगत करण्यात आले आहेत.

दिनांक २२ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ५.३० ते ६.३० वाजेच्या दरम्यान पारोळा शहरातील लवण गल्ली येथील महेंद्र फोटो स्टुडिओसमोर रथोत्सवाची गर्दी होती. यावेळी फिर्यादी गर्दीत असताना अज्ञात ३ ते ४ इसमांनी गर्दीचा फायदा घेत त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने जबरीने हिसकावून तोडून चोरून नेले. या घटनेप्रकरणी २५ ऑक्टोबर रोजी पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन जळगावचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना समांतर तपास करून गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक गायकवाड यांनी आपल्या अधिपत्याखालील अधिकारी आणि अंमलदारांचे तपास पथक तयार करून आवश्यक सूचना दिल्या. तपासादरम्यान प्राप्त गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे या गुन्ह्यातील आरोपी बीड शहरातील असल्याचे निष्पन्न झाले. त्याचे नाव गणेश कचरू पवार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने तांत्रिक पुरावे संकलित केले आणि बीड शहराकडे रवाना झाले.

स्थानिक पोलिसांच्या मदतीने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बीडमध्ये सलग आठ दिवस ठाण मांडून आरोपीचा शोध घेतला. अथक प्रयत्नांनंतर गणेश पवार याला ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर स्थानिक पोलीस ठाण्यात त्याची सखोल चौकशी करण्यात आली. पोलिसांच्या माहितीनुसार, त्याने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर चोरीस गेलेले सोन्याचे दागिने दोन पंच आणि सोनार यांच्या उपस्थितीत जप्त करण्यात आले. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये १३ ग्रॅम वजनाची पाटली असलेली डिझाइनची सोन्याची चेन, १७ ग्रॅम वजनाची फॅन्सी सोन्याची चेन आणि १७ ग्रॅम वजनाची गोफ असलेली सोन्याची चेन यांचा समावेश आहे. या तिन्ही दागिन्यांचे एकूण वजन ४७ ग्रॅम असून त्यांची किंमत ६ लाख ११ हजार रुपये आहे.

या गुन्ह्याचा पुढील तपास पारोळा पोलीस ठाण्याचे पोलीस हेडकॉन्स्टेबल हितेश चिंचोरे करीत आहेत.  ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि अमळनेर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष पवार, पोलीस हेडकॉन्स्टेबल हरिलाल पाटील, विलेश सोनवणे, राहुल बैसाने, पोलीस कॉन्स्टेबल राहुल कोळी, विलास गायकवाड, गोपाळ पाटील, प्रदीप सपकाळे, मिलिंद जाधव, गौरव पाटील आणि चालक पोलीस कॉन्स्टेबल रिजवान शेख यांनी या मोहिमेत सहभाग घेतला.


Protected Content

Play sound