यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । आदिवासी बांधवांसाठी खावटी योजना सुरू असल्याच्या नावाखाली विविध संघटना आणि व्यक्तींकडून अर्ज भरून घेतले जात असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. मात्र, सध्या शासनाकडून किंवा कोणत्याही विभागाकडून खावटी योजना राबविण्यात येत नसल्याचे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे या योजनेच्या नावाखाली होणाऱ्या संभाव्य फसवणुकीपासून आदिवासी बांधवांनी सावध राहावे, असे आवाहन प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांनी केले आहे.
जिल्हा माहिती अधिकारी, जळगाव यांच्याकडे ३ नोव्हेंबर २०२६ रोजी पाठविण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली आहे. खावटी योजनेच्या नावाने अर्ज भरून घेण्याबाबत तक्रारी प्राप्त झाल्यानंतर आदिवासी विकास विभागाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. प्रसिद्धीपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे की, खावटी योजना सध्या सुरू नसून या योजनेसाठी कोणत्याही कार्यालयाकडून अर्ज मागविण्यात आलेले नाहीत. त्यामुळे आदिवासी बांधवांनी या योजनेसाठी अर्ज करू नयेत. तसेच, कोणत्याही शासकीय कार्यालयात, मध्यस्थांकडे किंवा संकेतस्थळावर या योजनेच्या नावाने अर्ज सादर करण्याची आवश्यकता नाही.

खावटी योजनेचा लाभ मिळवून देण्याचे आमिष दाखवून काही व्यक्तींकडून आर्थिक मागणी केली जात असल्याची शक्यता लक्षात घेता, नागरिकांनी अशा आमिषांना बळी पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. कोणत्याही व्यक्तीने योजनेच्या नावाखाली पैशांची मागणी केल्यास किंवा फसवणुकीचा प्रकार निदर्शनास आल्यास तात्काळ आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाला कळवावे, असेही प्रशासनाने सूचित केले आहे. खावटी योजनेसंदर्भात भविष्यात शासनाकडून काही निर्णय घेतल्यास त्याची अधिकृत माहिती आदिवासी विकास विभागामार्फत वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येईल. त्यामुळे नागरिकांनी अफवा किंवा अनधिकृत माहितीवर विश्वास न ठेवता केवळ शासनाच्या अधिकृत सूचनांवरच विश्वास ठेवावा, असे प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांनी स्पष्ट केले आहे.



