Home Cities जळगाव नशिराबादकरांनो, पाणी जपून वापरा ! पाणीपुरवठ्यात २० मिनिटांची कपात ; १ नोव्हेंबरपासून...

नशिराबादकरांनो, पाणी जपून वापरा ! पाणीपुरवठ्यात २० मिनिटांची कपात ; १ नोव्हेंबरपासून नवा निर्णय लागू

0
19

नशिराबाद-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यंदा कमी पावसामुळे निर्माण झालेली दुष्काळी परिस्थिती आणि आगामी उन्हाळ्यात संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता नशिराबाद नगरपरिषदेने पाणी बचतीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शहरात चार दिवसांआड होणाऱ्या पाणीपुरवठ्याच्या वेळेत २० मिनिटांची कपात करण्यात आली असून, १ नोव्हेंबर २०२६ पासून नागरिकांना प्रत्येक पाणीपुरवठ्याच्या वेळी एक तास वीस मिनिटांऐवजी केवळ एक तास पाणी मिळणार आहे. उपलब्ध पाणीसाठा उन्हाळ्यापर्यंत पुरविण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे.

नशिराबाद शहराला बेळी येथील विहीर तसेच नशिराबाद-उमाळा रोडवरील मुर्दापूर तलावातून पाणीपुरवठा केला जातो. यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने या जलस्रोतांमधील उपलब्ध पाणीसाठ्यावर मर्यादा येण्याची शक्यता आहे. त्यातच विजेची उपलब्धता कमी होणे आणि पाणी उपसण्यासाठी उपलब्ध असलेला साठा झपाट्याने कमी होणे, या बाबींचा विचार करता आगामी उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे.

या संभाव्य संकटावर मात करण्यासाठी नगरपरिषदेकडून आतापासूनच पाणी बचतीचे नियोजन करण्यात येत आहे. उपलब्ध पाणीसाठ्याचा काटकसरीने वापर करून तो पुढील उन्हाळ्यापर्यंत पुरविणे, हा या निर्णयामागील प्रमुख उद्देश आहे. नगरपरिषदेचे प्रभारी नगराध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मुख्याधिकारी यांच्या आदेशानुसार सार्वजनिक पाणीपुरवठा व जलनिस्सारण समितीचे सभापती कीर्तीकांत पंडित चोबे यांनी नागरिकांसाठी जाहीर सूचना प्रसिद्ध केली आहे. पाणीपुरवठ्याच्या वेळेत कपात करण्यासोबतच नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करून नगरपरिषदेला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांनी घरातील नळांना तोट्या बसवाव्यात आणि नळांची गळती आढळल्यास ती तातडीने दुरुस्त करावी. पिण्याच्या पाण्याचा वापर वाहन धुणे, अंगण धुणे किंवा इतर अनावश्यक कामांसाठी करू नये. घरातील तसेच छतावरील पाण्याच्या टाक्यांमधील पाण्याचा योग्य वापर करावा, अशा सूचना नगरपरिषदेकडून देण्यात आल्या आहेत.

याशिवाय पावसाच्या पाण्याचे पुनर्भरण करून भूजल पातळी वाढविण्यास हातभार लावावा. लग्नसमारंभ आणि इतर सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये पाण्याचा अपव्यय टाळावा, असेही आवाहन करण्यात आले आहे. चार दिवसांच्या अंतराने मिळणाऱ्या पाण्यात आणखी २० मिनिटांची कपात झाल्याने नागरिकांना उपलब्ध पाण्याचे अधिक काटेकोर नियोजन करावे लागणार आहे. दरम्यान, पाणी बचतीची जबाबदारी केवळ नागरिकांची नसून नगरपरिषदेचीही आहे. शहरातील विविध भागांमध्ये पाणीपुरवठ्याच्या पाइपलाइनला होणारी गळती, फुटलेल्या पाइपलाइनमधून वाया जाणारे पाणी आणि इतर ठिकाणी होणारी नासाडी रोखण्यासाठी नगरपरिषदेने विशेष लक्ष देण्याची गरज आहे. अशा गळतीच्या घटना निदर्शनास आल्यास तातडीने दुरुस्ती करून पाण्याचा अपव्यय थांबवावा, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

प्रशासनाच्या उपाययोजनांना नागरिकांची साथ मिळाल्यास उपलब्ध पाणीसाठ्याचा अधिक काळ उपयोग होऊ शकतो. त्यामुळे प्रत्येक नशिराबादकराने पाण्याचा प्रत्येक थेंब जपून वापरावा आणि पाणी बचतीच्या मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन सभापती कीर्तीकांत पंडित चोबे यांनी केले आहे.


Protected Content

Play sound