फैजपूर (ता. यावल)-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । फैजपूर शहरात चोरट्यांनी पुन्हा एकदा धुमाकूळ घातला असून, प्रसिद्ध खंडेराव वाडी देवस्थानाच्या मागील परिसरातील एकाच वेळी तीन घरांना लक्ष्य करत घरफोडी केली. शुक्रवार, ३० ऑक्टोबर २०२६ रोजी ही घटना उघडकीस आली. या चोरीत सोन्याचे दागिने, रोख रक्कम यासह लाखो रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, खंडेराव वाडी देवस्थानाच्या मागील भागातील तीन घरांचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. यामध्ये धनराज मनोहर बडगुजर यांच्या घरातून सर्वाधिक सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरीला गेल्याची माहिती समोर आली आहे. चोरट्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने घरफोडी करून लाखोंचा ऐवज लंपास केला आणि घटनास्थळावरून पोबारा केला.

घटनेची माहिती मिळताच फैजपूर पोलीस स्टेशनचे एपीआय संदीप पाटील यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, पोलिसांकडून घटनेचा तपास केला जात आहे. चोरीस गेलेल्या मुद्देमालाचा नेमका आकडा आणि इतर तपशील तपासानंतर स्पष्ट होणार आहेत. एकाच परिसरातील तीन घरांमध्ये एकाच वेळी घरफोडी झाल्याने फैजपूर शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चोरट्यांनी बंद घरांना लक्ष्य केले की घरातील सदस्यांच्या अनुपस्थितीचा फायदा घेतला, याचाही तपास होण्याची गरज व्यक्त होत आहे. परिसरातील नागरिकांनी चोरट्यांचा तातडीने शोध घेऊन चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्याची मागणी केली आहे.



