Home क्राईम अडावद पोलिसांची धडाकेबाज कामगिरी! अवघ्या तीन महिन्यांत २० बेपत्ता व्यक्तींचा शोध

अडावद पोलिसांची धडाकेबाज कामगिरी! अवघ्या तीन महिन्यांत २० बेपत्ता व्यक्तींचा शोध

0
9


अडावद-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । चोपडा तालुक्यातील अडावद पोलिसांनी बेपत्ता आणि अपहृत व्यक्तींचा शोध घेण्यासाठी राबविलेल्या विशेष मोहिमेत उल्लेखनीय यश मिळवले आहे. अवघ्या तीन महिन्यांत बेपत्ता झालेल्या तसेच अपहरणाच्या प्रकरणांतील मुली, महिला, बालके आणि पुरुष अशा एकूण २० व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना सुखरूपपणे त्यांच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले. तपासातील सातत्य, गोपनीय माहितीचे जाळे आणि आधुनिक तांत्रिक विश्लेषणाच्या प्रभावी वापरामुळे अडावद पोलिसांनी ही कौतुकास्पद कामगिरी केली आहे.

जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि चोपडा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. अडावद पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत कंडारे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांच्या विशेष पथकाने बेपत्ता व्यक्तींच्या प्रकरणांचा गांभीर्याने तपास करून त्यांचा शोध घेण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले.

अडावद पोलीस ठाण्याच्या हद्दीत दाखल असलेल्या भारतीय न्याय संहिता (BNS) आणि बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण कायदा (POCSO) अंतर्गत अपहरणाच्या गुन्ह्यांसह बेपत्ता व्यक्तींच्या तक्रारींचा तपास करण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली होती. या पथकांनी घटनास्थळांची पाहणी, साक्षीदारांची चौकशी, मोबाईल कॉल डिटेल रेकॉर्ड (CDR) आणि तांत्रिक विश्लेषणाच्या माध्यमातून तपासाची दिशा निश्चित केली. तसेच गोपनीय माहिती देणाऱ्यांचे जाळे सक्रिय ठेवून प्रत्येक प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा करण्यात आला.

महिला आणि बालकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत पोलिसांनी संवेदनशीलतेने तपास केला. बेपत्ता व्यक्तींचा ठावठिकाणा शोधण्यासाठी विविध माहितीचे विश्लेषण करून उपलब्ध पुराव्यांच्या आधारे शोधमोहीम पुढे नेण्यात आली. या प्रयत्नांतून तीन महिन्यांत एकूण २० व्यक्तींचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले. संबंधित व्यक्तींना सुरक्षितपणे त्यांच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले.

या मोहिमेत सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत कंडारे यांच्या नेतृत्वाखाली प्रोबेशनरी पोलीस उपनिरीक्षक सचिन नागरे, पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र सोनवणे, सहायक पोलीस उपनिरीक्षक सुनील तायडे, पोलीस हवालदार जयदीप राजपूत, विनोद धनगर, संजय धनगर, शेषराव तोरे, पोलीस कॉन्स्टेबल किरण शिरसाठ, अन्वर तडवी, भूषण चव्हाण आणि महिला पोलीस कॉन्स्टेबल दिव्या मराठे यांनी सहभाग घेतला.

अडावद पोलिसांच्या या कामगिरीमुळे बेपत्ता व्यक्तींच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला आहे. आपल्या जवळच्या व्यक्तींचा शोध लागून त्या सुखरूप परतल्याने नातेवाइकांनी पोलिसांचे आभार मानले असून, पोलिसांच्या तत्परतेबद्दल नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.


Protected Content

Play sound