Home Cities एरंडोल कासोदा पोलिसांची अवैध वाळू वाहतुकीवर धडक कारवाई ; ४ वाहने आणि ७६...

कासोदा पोलिसांची अवैध वाळू वाहतुकीवर धडक कारवाई ; ४ वाहने आणि ७६ ब्रास वाळूसह ३१.५८ लाखांचा मुद्देमाल जप्त

0
20


एरंडोल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील कासोदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध वाळू उत्खनन आणि वाहतुकीविरुद्ध पोलीस व महसूल विभागाने संयुक्त धडक कारवाई केली आहे. उत्राण गावाच्या वेशीजवळील मारुती मंदिर परिसरासह करदन शिवारातील गिरणा नदीपात्राजवळ करण्यात आलेल्या या कारवाईत चार वाहने आणि त्यातील वाळूसह एकूण ३१ लाख ५८ हजार १०७ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याशिवाय, अवैधरीत्या साठवून ठेवलेला ६० ब्रास वाळूचा साठाही जप्त करून एरंडोल तहसील कार्यालयात हलविण्यात आला आहे. या कारवाईमुळे अवैध वाळू उत्खनन व वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

जिल्हाधिकारी रोहन घुगे, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय अधिकारी मनीषकुमार गायकवाड आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकुरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ही संयुक्त कारवाई करण्यात आली. २५ आणि २६ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्रीच्या सुमारास विविध ठिकाणी तपासणी करून वाळू वाहतुकीसाठी वापरण्यात येणारी वाहने ताब्यात घेण्यात आली. २५ ऑक्टोबर रोजी रात्री सुमारे ११ वाजता उत्राण गावातील मारुती मंदिराजवळ टाटा कंपनीचे मॉडेल १५१२ असलेले सहा चाकी आयशर वाहन क्रमांक एमएच १८ बीजी ७२०८ आढळून आले. या वाहनात अंदाजे पाच ब्रास वाळू असल्याचे तपासात समोर आले. कारवाईसाठी पथक घटनास्थळी पोहोचताच वाहनचालक वाहन जागेवर सोडून पळून गेला. त्यामुळे त्याची ओळख पटू शकली नाही. या प्रकरणात वाहन व वाळूसह एकूण ६ लाख २३ हजार ६२८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

करदन शिवारातील गिरणा नदीपात्र परिसरात २६ ऑक्टोबर रोजी रात्री सुमारे एक वाजता टाटा कंपनीचा निळ्या रंगाचा डंपर क्रमांक एमएच १८ सीबी १९२० आढळून आला. या वाहनात अंदाजे आठ ब्रास वाळू होती. या प्रकरणी वाहनमालक निलेश राजेंद्र भदाणे आणि चालक रामू महादेव शिवाई यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत एकूण ८ लाख ३७ हजार ६५६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याच परिसरात २५ ऑक्टोबर रोजी रात्री सुमारे १.३० वाजता चॉकलेटी रंगाचे आयशर वाहन क्रमांक एमएच २० जीसी ९१४७ आढळून आले. या वाहनात अंदाजे दोन ब्रास वाळू होती. या प्रकरणी शाहरुख शब्बीर पठाण याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, वाहन व वाळूसह ६ लाख ९ हजार ४९४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

त्यानंतर २५ ऑक्टोबर रोजी रात्री सुमारे दोन वाजता करदन शिवारातील गिरणा नदीपात्र परिसरात टाटा कंपनीचा निळसर रंगाचा डंपर क्रमांक एमएच ४८ एजी १५९३ आढळून आला. या डंपरमध्ये अंदाजे एक ब्रास वाळू असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी धुळे येथील भूषण शिवाजी सोनवणे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत एकूण ८ लाख ४ हजार ७०७ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. चार वाहनांवरील कारवाईव्यतिरिक्त परिसरात अवैधरीत्या साठवून ठेवलेला ६० ब्रास वाळूचा ढिगारा जप्त करण्यात आला. हा वाळूसाठा एरंडोल तहसील कार्यालयात हलविण्यात आला आहे. चार वाहनांमध्ये आढळलेल्या वाळूसह ६० ब्रास साठा मिळून एकूण ७६ ब्रास वाळू जप्त केल्याचे कारवाईच्या तपशिलात नमूद आहे.

या प्रकरणांमध्ये  कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीला आळा घालण्यासाठी पोलीस आणि महसूल विभागाने संयुक्तपणे ही मोहीम राबविली. ही कारवाई कासोदा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी श्रीकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पोलीस पथकातील नितीन सूर्यवंशी, धर्मेंद्र ठाकुर, श्रीकांत ब्राम्हणे, निलेश गायकवाड आणि योगेश पाटील यांनी कारवाईत सहभाग घेतला. महसूल विभागाकडून तहसीलदार गोपाळ पाटील, ग्राम महसूल अधिकारी रवीराज साहेबराव पाटील (उत्राण), वैभव पाटे (एरंडोल), संदीप पाटील (गालापूर), नरेंद्र पाटील (उत्राण) तसेच मंडळ अधिकारी नदीम शेख यांच्या पथकाने सहकार्य केले.


Protected Content

Play sound