
जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील कुसुंबे आणि मन्यारखेडा येथील जलजीवन मिशनअंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे काम मागील तीन वर्षांपासून अपूर्ण अवस्थेत असल्याचा आरोप करत हे काम तातडीने सुरू करण्याची मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. संबंधित कामे गेल्या वर्षभरापासून बंद असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले असून, येत्या १५ दिवसांत काम सुरू न झाल्यास ग्रामस्थांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

या संदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या जळगाव विभागाचे कार्यकारी अभियंता कृष्णा सरूबाई बाळासाहेब आव्हाड यांना निवेदन देण्यात आले आहे. ऑक्टोबर २०२२ मध्ये मंजूर झालेल्या जलजीवन मिशनअंतर्गत पाणीपुरवठा योजनेची कामे अद्याप पूर्ण झालेली नसल्याचे निवेदनात म्हटले आहे. संबंधित ठेकेदार तसेच शासनाचे कर्मचारी गेल्या वर्षभरापासून कामाच्या ठिकाणी दिसून येत नसल्याचा दावाही करण्यात आला आहे.
कुसुंबे आणि मन्यारखेडा येथील पाणीपुरवठा योजनेची कामे नेमक्या कोणत्या कारणामुळे बंद आहेत, याचा तातडीने खुलासा करावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. अपूर्ण कामे त्वरित सुरू करून दोन्ही गावांतील नागरिकांना वाघूर प्रकल्पातून नियमित पाणीपुरवठा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणीही करण्यात आली आहे. कुसुंबे येथील फिल्टर प्लांटचे काम अद्याप अपूर्ण असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तसेच तुळजाई नगरातील पाण्याच्या टाकीचे बांधकामही पूर्ण झालेले नसल्याने पाणीपुरवठा योजनेच्या कार्यक्षमतेवर परिणाम होत असल्याचे सांगण्यात आले आहे. याशिवाय गणपती नगर, सुरेशदादा जैन नगर, छत्रपती संभाजीनगर, कुसुंबा आणि उजाड कुसुंबा परिसरातील अपूर्ण व बंद अवस्थेतील कामेही तातडीने पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली आहे.
वाघूर धरणाच्या जलाशयापासून विमानतळापर्यंत टाकण्यात आलेल्या जलवाहिनीचे कुसुंबे गावापर्यंतचे जोडणीचे काम शंभर टक्के पूर्ण करावे, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे. फिल्टर प्लांटचे काम पूर्ण होईपर्यंत कुसुंबे ग्रामपंचायतीच्या सध्या कार्यरत असलेल्या जुन्या पाण्याच्या टाक्यांचा वापर करून वाघूर प्रकल्पातून संपूर्ण गावाला सुरळीत पाणीपुरवठा करण्याची पर्यायी व्यवस्था करावी, असेही निवेदनात म्हटले आहे.यंदा कमी पाऊस झाल्यामुळे राज्यातील अनेक तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याचा उल्लेख करत कुसुंबे परिसरातील पाणीटंचाईबाबतही चिंता व्यक्त करण्यात आली आहे. परिसरातील विहिरींची सद्यस्थिती पाहता त्या जानेवारी २०२७ पर्यंतच पाणीपुरवठा करू शकतील, अशी शक्यता निवेदनकर्त्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे भविष्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण होण्यापूर्वी जलजीवन मिशनची योजना पूर्ण करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
संबंधित विभागाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन येत्या १५ दिवसांच्या आत सर्व बंद कामे सुरू करावीत, अशी स्पष्ट मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निर्धारित मुदतीत काम सुरू न झाल्यास कुसुंबे आणि मन्यारखेडा येथील नागरिकांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. या निवेदनावर प्रेमराज राठोड, सोपान राजपूत, हर्षा, सुनील पाटील, बेबीबाई तोमर, वनिता पाटील, रेखा पाटील आणि संजय पाटील यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जळगाव तालुका प्रमुख प्रमोद गंगाधर घुगे यांच्या स्वाक्षरीने हे निवेदन सादर करण्यात आले आहे.



