
जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । चोपडा तालुक्यातील नागरिकांना मोतीबिंदूच्या समस्येतून मुक्त करण्यासाठी गोदावरी फाउंडेशन संचलित डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या ह.भ.प. जगन्नाथ महाराज अंजाळेकर नेत्रालयातर्फे सोमवार, २६ ऑक्टोबरपासून ‘मोतीबिंदूमुक्त चोपडा तालुका’ या विशेष अभियानाला सुरुवात होणार आहे. या अभियानांतर्गत २६ ऑक्टोबर ते ४ डिसेंबर २०२६ या कालावधीत तालुक्यातील विविध गावांमध्ये नेत्रतपासणी शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत. यासाठी तज्ज्ञ नेत्ररोग डॉक्टरांची टीम नियुक्त करण्यात आली असून, नागरिकांना त्यांच्या गावातच नेत्रतपासणीची सुविधा उपलब्ध होणार आहे.

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या नेत्रालयातर्फे यापूर्वी रावेर आणि यावल तालुक्यांमध्ये अशा प्रकारचे अभियान यशस्वीपणे राबविण्यात आले आहे. त्याच धर्तीवर आता चोपडा तालुक्यातील प्रत्येक गावात पोहोचून नागरिकांच्या डोळ्यांची तपासणी करणे, मोतीबिंदूची लक्षणे असलेल्या रुग्णांची ओळख पटविणे आणि गरजेनुसार पुढील उपचारांसाठी मार्गदर्शन करणे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. या अभियानाचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले असून, २६ ऑक्टोबर रोजी धानोरा, मोहरद आणि बीडगाव येथे शिबिरे होणार आहेत. २८ ऑक्टोबर रोजी अडावद, सुटकर आणि खुर्डी येथे, तर ३० ऑक्टोबर रोजी वड्री, मंगरूळ आणि वडली येथे नेत्रतपासणी केली जाणार आहे. २ नोव्हेंबर रोजी विष्णापूर, अडगाव आणि विरवाडे, तर ४ नोव्हेंबर रोजी नागलवाडी, वराड आणि गणपूर येथे शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत. १३ नोव्हेंबर रोजी चांदसणी, कमलगाव आणि पंचक येथे, १६ नोव्हेंबर रोजी वैजापूर, देन्हारी आणि उमर्टी येथे, तर १८ नोव्हेंबर रोजी सत्रासेन, लासूर आणि चौगाव येथे नेत्रतपासणी होणार आहे. २० नोव्हेंबर रोजी अकुलखेडा, चहार्डी आणि हातेड येथे, तर २३ नोव्हेंबर रोजी बुधगाव, अनवरदे आणि वाळसी येथे शिबिरे आयोजित केली जाणार आहेत.
२७ नोव्हेंबर रोजी कुसुंबा, वेळोदे आणि वनेदा येथे, ३० नोव्हेंबर रोजी खाचणे, कुरवेल आणि तावसे येथे, तर २ डिसेंबर रोजी निमगाव, वेले आणि गरनाड येथे नेत्रतपासणी केली जाणार आहे. या अभियानाचा समारोप ४ डिसेंबर रोजी कलोबा, कठोरा आणि वटकर या गावांतील शिबिरांनी होणार आहे. या अभियानासाठी डॉ. एन. एस. आर्विकर आणि डॉ. प्रेमचंद पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली तज्ज्ञ डॉक्टरांची टीम कार्यरत राहणार आहे. या टीममध्ये डॉ. नि. तु. पाटील, डॉ. रेणुका पाटील, डॉ. मयुरी निलावाड, डॉ. सृष्टी पाटील, डॉ. निखिल चौधरी, डॉ. शुभम भारसाकळे, डॉ. अभिजीत काकड, डॉ. अनीष कांदळगावकर, डॉ. दिव्या पोखरणकर, डॉ. रिया गोरे, डॉ. कीर्ती महाजन, डॉ. मुग्धा बिचकर, डॉ. गौरव पाटील, डॉ. वैष्णव व्यवहारे, डॉ. ऋतुजा चव्हाण आणि डॉ. अश्विनी काकडे यांचा समावेश आहे. हे सर्व डॉक्टर अभियानाच्या माध्यमातून रुग्णसेवेत योगदान देणार असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.
वाढत्या वयामुळे किंवा अन्य कारणांमुळे दृष्टी कमी होणे, धूसर दिसणे यांसारख्या समस्यांकडे दुर्लक्ष केल्यास दैनंदिन जीवनावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी वेळेत नेत्रतपासणी करून घेणे आवश्यक आहे. मोतीबिंदूचे निदान झाल्यास तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुढील उपचार करणे महत्त्वाचे आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना नेत्रसेवा सहज उपलब्ध व्हावी आणि उपचारांबाबत जागरूकता वाढावी, या दृष्टीने हे अभियान महत्त्वपूर्ण ठरणार आहे. चोपडा तालुक्यातील दृष्टीदोष किंवा मोतीबिंदूची समस्या असलेल्या जास्तीत जास्त नागरिकांनी या शिबिरांचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. शिबिराबाबत अधिक माहिती मिळविण्यासाठी तसेच नावनोंदणीसाठी डॉ. कीर्ती महाजन (९१३००७४०९३) किंवा डॉ. रिया गोरे (७७१८८१२०७४) यांच्याशी संपर्क साधता येणार आहे.



