Home प्रशासन नगरपालिका वरणगावात बस रोको आंदोलन ! नगराध्यक्ष सुनील काळेंचा इशारा

वरणगावात बस रोको आंदोलन ! नगराध्यक्ष सुनील काळेंचा इशारा

0
47


वरणगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । वरणगाव शहरातून एसटी बसेस नियमितपणे चालवाव्यात आणि शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आधुनिक बसस्थानक मंजूर करावे, या मागणीसाठी लोकनियुक्त नगराध्यक्ष सुनील काळे यांनी शनिवारी राष्ट्रीय महामार्गावरील वरणगाव बायपासवर बस रोको आंदोलन केले. बायपासवरून थेट जाणाऱ्या बसेस शहरात वळविण्याची मागणी करत त्यांनी परिवहन विभागाचे लक्ष वेधले. यापुढेही बसेस बायपासवरून थेट गेल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल आणि एकही बस बायपासवरून जाऊ दिली जाणार नाही, असा इशारा काळे यांनी दिला.

वरणगाव हे सुमारे ६० हजार लोकसंख्येचे नगरपरिषद शहर असून, परिसरातील २८ खेड्यांसह बोदवड तालुक्यातील नागरिकांसाठीही ते महत्त्वाचे केंद्र आहे. मात्र, शहराला बायपास झाल्यानंतर अनेक एसटी बसेस वरणगावमध्ये न येता थेट बायपासवरून जात असल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात आहे. त्यामुळे शहरातील प्रवाशांना बससेवेचा लाभ घेण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे.

वरणगावमधून जळगाव आणि भुसावळ येथे शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. तसेच नोकरी, व्यवसाय आणि अन्य कामांसाठी दररोज अनेक प्रवासी एसटी बसने प्रवास करतात. मात्र, काही बसचालकांच्या मनमानीमुळे बसेस शहरात न येता बायपासवरून जात असल्याने विद्यार्थ्यांसह सर्वसामान्य प्रवाशांची गैरसोय होत असल्याचा आरोप करण्यात आला. बससेवा उपलब्ध नसल्यामुळे प्रवाशांना पर्यायी वाहतुकीचा आधार घ्यावा लागत असल्याचेही आंदोलनकर्त्यांनी नमूद केले. बसेस वरणगाव शहरात न आणता थेट बायपासवरून नेल्यामुळे एसटी महामंडळाच्या उत्पन्नावरही परिणाम होत असल्याचा दावा नगराध्यक्ष सुनील काळे यांनी केला. परिवहनमंत्री प्रताप सरनाईक आणि संबंधित जिल्हा नियंत्रकांनी या प्रकाराची तातडीने दखल घ्यावी. वरणगावमधून जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या बसेससह बायपासमार्गे जाणाऱ्या सर्व संबंधित बसेस शहरातून चालविण्याबाबत स्पष्ट निर्देश द्यावेत, अशी मागणी त्यांनी केली.

या मागण्यांसाठी काळे यांनी सकाळपासून बायपासवर बस रोको आंदोलन सुरू केले. बायपासवरून जाणाऱ्या बसचालकांना शहरातून बस नेण्याची विनंती करण्यात आली. त्यानंतर काही बसेस वरणगाव शहरातून वळविण्यात आल्या. आंदोलनादरम्यान परिवहन विभागाचे अधिकारी एल. बी. पाटील पूर्ण वेळ उपस्थित होते. बायपासवरून थेट गेलेल्या काही बसेसच्या चालकांना लेखी नोटीस देऊन कारवाई करण्यात आल्याची माहिती आंदोलनस्थळी देण्यात आली. वरणगाव शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आधुनिक बसस्थानक मंजूर करावे, ही मागणीही नगराध्यक्ष काळे यांनी आक्रमकपणे मांडली. शहराची लोकसंख्या, परिसरातील गावांशी असलेला संपर्क आणि विद्यार्थ्यांसह प्रवाशांची वाढती गरज लक्षात घेता बसस्थानकाची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. बसस्थानक झाल्यास प्रवाशांना एकाच ठिकाणी बससेवा उपलब्ध होऊन शहरातील वाहतूक आणि प्रवासी व्यवस्थेला अधिक सुविधा मिळू शकतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

यापुढेही एसटी बसेस वरणगाव शहरात न येता थेट बायपासवरून गेल्यास आंदोलन अधिक तीव्र केले जाईल, असा इशारा सुनील काळे यांनी दिला. प्रवाशांच्या हक्कासाठी आणि शहराला नियमित बससेवा मिळण्यासाठी हा लढा सुरूच राहील, अशी भूमिका त्यांनी मांडली. त्यामुळे परिवहन विभाग आणि एसटी महामंडळ या मागण्यांवर काय निर्णय घेतात, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. या आंदोलनावेळी भुसावळ विधानसभा शेतकी संघाचे संचालक प्रकाशभाऊ चौधरी, प्रवासी संघटनेचे अध्यक्ष तथा नगरसेवक नानाभाऊ चौधरी, राजू पालिमकर, मुस्लिमभाई अन्सारी, आशूभाई अखलाक शेख, मनोज माळी, सूर्यकांत माळी, मिलिंद भैसे, शामराव धनगर, बळीरामदादा सोनवणे, अतुल शेळके, राजूभाऊ गवळी, गोपाल देवरे यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते.


Protected Content

Play sound