Home धर्म-समाज मोतीलाल जोगी यांची अखिल भारतीय नाथपंथी समाज महासंघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी नियुक्ती

मोतीलाल जोगी यांची अखिल भारतीय नाथपंथी समाज महासंघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी नियुक्ती

0
19


मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर येथील ज्येष्ठ पत्रकार तथा मानवाधिकार संघटना आणि जिल्हा पत्रकार संघाचे जिल्हा संघटक मोतीलाल फकीरानाथ जोगी यांची अखिल भारतीय नाथपंथी समाज महासंघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या नियुक्तीमुळे मुक्ताईनगरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, सामाजिक, राजकीय आणि पत्रकारिता क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

नाथपंथी समाज महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. जयाजी नाथ यांच्या आदेशानुसार, महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीचे ज्येष्ठ पदाधिकारी तथा सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक डी. जी. ठाकरे यांच्या सल्ल्याने राष्ट्रीय सचिव प्रा. डॉ. विश्वनाथ नाथ यांनी मोतीलाल जोगी यांची लेखी पत्राद्वारे या पदावर नियुक्ती केली आहे. मोतीलाल जोगी यांना महाविद्यालयीन जीवनापासून विद्यार्थी संघटना, राजकीय पक्ष, पत्रकारिता आणि विविध सामाजिक संघटनांमध्ये कार्य करण्याचा प्रदीर्घ अनुभव आहे. समाजातील विविध घटकांशी असलेल्या जनसंपर्काच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक क्षेत्रात काम केले आहे. आता उत्तर महाराष्ट्रातील नाथपंथी समाजाच्या संघटनात्मक बांधणीसाठी ते पुढाकार घेणार आहेत.

उत्तर महाराष्ट्रातील भटक्या जमातींमधील विविध नाथपंथीय समाजघटकांना एकत्र आणणे, समाजबांधवांमध्ये एकजूट निर्माण करणे, महासंघाची सदस्यसंख्या वाढविणे आणि उत्तर महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये जिल्हा कार्यकारिणी स्थापन करणे, ही प्रमुख उद्दिष्टे त्यांच्या कार्यकाळात असणार आहेत. समाजाच्या संघटनात्मक विस्तारासोबतच समाजबांधवांच्या विविध प्रश्नांना प्रभावी व्यासपीठ मिळवून देण्यावरही भर दिला जाणार आहे. समाजातील नागरिकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी लोकशाही मार्गाने प्रयत्न करणे, अन्यायाविरुद्ध आवाज उठविणे आणि बेरोजगार युवक, विद्यार्थी, महिला तसेच दुर्लक्षित घटकांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणे, असा त्यांचा मानस आहे. समाजातील गरजू घटकांना शासकीय योजनांची माहिती मिळावी आणि त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होता यावे, यासाठीही प्रयत्न केले जाणार आहेत.

नाथपंथीय समाजबांधवांची वर्षातून किमान एकदा व्यापक बैठक आयोजित करण्याचे नियोजन आहे. या बैठकीत राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्रीय सचिव आणि महासंघातील अन्य पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली समाजाच्या विविध प्रश्नांवर चर्चा करून सामाजिक उपक्रमांची आखणी केली जाणार आहे. समाजातील विविध घटकांना संघटित करून त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी सामूहिक प्रयत्न करण्यावर भर राहणार आहे. या नियुक्तीबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना मोतीलाल जोगी यांनी, आपल्यावर सोपविण्यात आलेली जबाबदारी ज्येष्ठांचे मार्गदर्शन आणि सर्वांच्या सहकार्याने यशस्वीपणे पार पाडू, असा विश्वास व्यक्त केला. नाथपंथी समाजाच्या प्रगतीसाठी, समाजबांधवांच्या हक्कांसाठी आणि सामाजिक न्यायासाठी सातत्याने कार्य करण्याचा संकल्पही त्यांनी व्यक्त केला.


Protected Content

Play sound