Home प्रशासन जिल्हा परिषद मुक्ताईनगर तालुक्यात प्रशासकीय कारवाईचा बडगा ! कुऱ्हा ग्रामपंचायत अधिकाऱ्याचे निलंबन 

मुक्ताईनगर तालुक्यात प्रशासकीय कारवाईचा बडगा ! कुऱ्हा ग्रामपंचायत अधिकाऱ्याचे निलंबन 

0
19


मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर तालुक्यातील ग्रामपंचायत स्तरावरील कामकाजातील दिरंगाई, शासकीय योजनांच्या अंमलबजावणीत दुर्लक्ष आणि वसुली अभियानातील हलगर्जीपणाची दखल घेत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर यांनी प्रशासकीय कारवाईचा बडगा उगारला आहे. कुऱ्हा ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत अधिकारी शंकर नारायण इंगळे यांना १९ ऑक्टोबर रोजी निलंबित करण्यात आले आहे. तर बेलसवाडी येथील कंत्राटी ग्रामसेवक गजानन गोविंदा सरोदे यांना सेवा समाप्ती का करण्यात येऊ नये, याबाबत कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. या कारवाईमुळे तालुक्यातील ग्रामपंचायत स्तरावरील प्रशासकीय कामकाजाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

मुक्ताईनगर पंचायत समिती येथे १५ ऑक्टोबर रोजी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसेवक आणि ग्रामपंचायत अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी, घरकुल योजनेचे उद्दिष्ट, रोजगार हमी योजनेतील कामकाज आणि ग्रामपंचायतींच्या वसुली अभियानाचा आढावा घेण्यात आला. यावेळी कुऱ्हा येथील ग्रामपंचायत अधिकारी शंकर इंगळे आणि बेलसवाडी येथील कंत्राटी ग्रामसेवक गजानन सरोदे यांच्या कामकाजाबाबत गंभीर स्वरूपाच्या तक्रारी समोर आल्याचे सांगण्यात आले. या आढावा बैठकीनंतर प्रशासकीय पातळीवर कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली. मुक्ताईनगर पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी कीर्ती कनवाडे यांनी १६ ऑक्टोबर रोजी संबंधित कर्मचाऱ्यांच्या कामकाजाबाबत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे पत्रव्यवहार केला. त्यानंतर प्राप्त तक्रारी आणि कामकाजातील त्रुटींच्या अनुषंगाने पुढील कार्यवाही करण्यात आली.

कुऱ्हा ग्रामपंचायतीचे अधिकारी शंकर नारायण इंगळे यांच्याविरोधात काढण्यात आलेल्या निलंबन आदेशात अनेक बाबींवर ठपका ठेवण्यात आला आहे. प्रधानमंत्री आवास योजनेतील उद्दिष्ट अपूर्ण ठेवणे, रोजगार हमी योजनेअंतर्गत मस्टर काढण्यास दिरंगाई करणे, नमुना क्रमांक ८ व ९ ऑनलाइन न करणे, अंगणवाडीला वीजजोडणी उपलब्ध करून न देणे आणि बोलक्या भिंती रंगविण्याचे काम पूर्ण न करणे, अशा त्रुटींचा आदेशात उल्लेख करण्यात आला आहे. याशिवाय सेवा संकल्प अभियानाबाबत अनास्था दाखविणे, मुख्यमंत्री अभियानात ग्रामपंचायतीला बक्षिसापासून वंचित राहावे लागणे आणि ग्रामपंचायतीच्या वसुली अभियानात दिरंगाई करणे, या बाबीही निलंबनाच्या आदेशात नमूद करण्यात आल्या आहेत. ग्रामपंचायत स्तरावर राबविण्यात येणाऱ्या शासकीय योजनांची उद्दिष्टे पूर्ण करणे आणि प्रशासकीय कामकाज वेळेत पार पाडणे अपेक्षित असताना संबंधित बाबींमध्ये त्रुटी आढळल्याने ही कारवाई करण्यात आली.

महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा नियम, १९६४ मधील नियम ३, भाग (१) मधील तरतुदींनुसार शंकर इंगळे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. निलंबनाच्या कालावधीत त्यांचे मुख्यालय पाचोरा पंचायत समिती येथे निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे कुऱ्हा ग्रामपंचायतीतील कामकाजासंदर्भात प्रशासनाने कठोर भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे. दुसरीकडे, बेलसवाडी येथील कंत्राटी ग्रामसेवक गजानन गोविंदा सरोदे यांच्या कामकाजाबाबतही तक्रारी प्राप्त झाल्यानंतर त्यांना सेवा समाप्ती करण्यासंदर्भात नोटीस बजावण्यात आली आहे. कामकाजातील दुर्लक्ष, टाळाटाळ, हलगर्जीपणा आणि गैरवर्तणूक यांसारखे आरोप या नोटिशीत नमूद करण्यात आल्याची माहिती आहे. संबंधित ग्रामसेवकाला आपली बाजू मांडण्यासाठी खुलासा सादर करण्याची संधी देण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्या खुलाशाचा विचार करूनच सेवेसंदर्भातील पुढील निर्णय घेतला जाणार आहे.


Protected Content

Play sound