Home क्राईम माऊली नगरातील चॉपर हल्ल्यात एकाचा खून, दुसरा गंभीर ; एमआयडीसी पोलिसांनी २४...

माऊली नगरातील चॉपर हल्ल्यात एकाचा खून, दुसरा गंभीर ; एमआयडीसी पोलिसांनी २४ तासांत आरोपीला पकडले

0
15


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील खेडी बुद्रुक येथील माऊली नगर परिसरात मोटारसायकलचा लाईट सुरू-बंद करण्यावरून झालेल्या वादातून धारदार चॉपरने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात किरण विठ्ठल पाटील (वय ४४) यांचा मृत्यू झाला, तर किशोर छगन पाटील (वय ३५) हे गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना २० ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री साडेआठच्या सुमारास घडली. या गंभीर गुन्ह्याची दखल घेत एमआयडीसी पोलिसांनी तांत्रिक तपास आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयित आरोपी मयूर चैत्राराम जाधव याला २४ तासांच्या आत ताब्यात घेतले.

मिळालेल्या माहितीनुसार, माऊली नगर, खेडी बुद्रुक परिसरात काही महिला बसलेल्या असताना मयूर चैत्राराम जाधव हा मोटारसायकलवरून तेथे आला. त्याने मोटारसायकलचा लाईट सुरू-बंद केल्याने परिसरातील महिलांनी त्याला जाब विचारला. याच कारणावरून वाद निर्माण झाला. या वादातून आरोपीने धारदार चॉपरने हल्ला केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात किरण विठ्ठल पाटील यांचा मृत्यू झाला, तर किशोर छगन पाटील गंभीर जखमी झाले. या प्रकरणी जखमी किशोर छगन पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथक नियुक्त केले. आरोपीचा शोध घेण्यासाठी पथकाला आवश्यक सूचना देण्यात आल्या. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून महत्त्वाची माहिती गोळा केली. तसेच तांत्रिक तपास आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून तपासाला गती दिली. या तपासादरम्यान माऊली नगर, खेडी बुद्रुक येथील रहिवासी मयूर चैत्राराम जाधव याला गुन्ह्याच्या तपासासाठी ताब्यात घेण्यात आले. घटनेनंतर अवघ्या २४ तासांच्या आत पोलिसांनी संशयित आरोपीला ताब्यात घेतल्याने या कारवाईची माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली आहे. मात्र, गुन्ह्यातील नेमकी भूमिका आणि इतर बाबींचा उलगडा पुढील तपासातून होणार आहे.

ही कारवाई जळगावचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे आणि एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके, ग्रेड पोलीस उपनिरीक्षक विजयसिंग पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल रामकृष्ण पाटील, गिरीष पाटील, प्रमोद लाडवंजारी, किरण चौधरी, पोलीस नाईक प्रदीप चौधरी, पोलीस कर्मचारी विशाल कोळी, रमाकांत साळुंखे, नितीन ठाकूर, राहुल घेटे, गणेश ठाकरे, किरण पाटील, शशिकांत मराठे, ललित नारखेडे आणि मोतीलाल बोरसे यांनी सहभाग घेतला. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कृष्णा पाटील करीत आहेत.


Protected Content

Play sound