Home Cities मुक्ताईनगर मुक्ताईनगरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगराच्या भव्य प्रवेशद्वाराचे उद्घाटन ; आमदार चंद्रकांत पाटील...

मुक्ताईनगरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगराच्या भव्य प्रवेशद्वाराचे उद्घाटन ; आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते लोकार्पण

0
28


मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । धम्मचक्र प्रवर्तन दिन आणि विजयादशमीच्या मंगलमय पर्वाचे औचित्य साधून मुक्ताईनगर शहरातील प्रभाग क्रमांक ८ मधील बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगराच्या भव्य प्रवेशद्वाराचे उद्घाटन आमदार चंद्रकांतभाऊ पाटील यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. या सोहळ्यामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निणर्मा झाले. सामाजिक एकता, बंधुता, समता आणि स्वाभिमानाचा संदेश देणारे हे प्रवेशद्वार परिसराच्या सौंदर्यात भर घालणारे ठरणार आहे.

धम्मचक्र प्रवर्तन दिन हा भारतीय बौद्ध समाजाच्या इतिहासातील महत्त्वाचा दिवस असून, विजयादशमीच्या पर्वालाही विशेष सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्त्व आहे. अशा मंगलमय मुहूर्तावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगराच्या प्रवेशद्वाराचे उद्घाटन झाल्याने या कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि सामाजिक न्यायाच्या विचारांचे स्मरण करून देणारे हे प्रवेशद्वार परिसराची स्वतंत्र ओळख निर्माण करण्यास मदत करेल, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

आमदार चंद्रकांतभाऊ पाटील यांच्या हस्ते प्रवेशद्वाराचे उद्घाटन झाल्यानंतर उपस्थित मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समाजबांधवांनी या उपक्रमाबद्दल आनंद व्यक्त केला. धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या विचारांचा वारसा जपत समाजात एकोपा, परस्पर आदर आणि सामाजिक सलोखा टिकवून ठेवण्याचे महत्त्व यानिमित्ताने अधोरेखित झाले. अशा उपक्रमांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये सामाजिक बांधिलकीची भावना अधिक दृढ होण्यास मदत होते.

या उद्घाटन सोहळ्याला कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जयपालभाऊ बोदडे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख छोटूभाऊ भोई, युवासेनेचे जिल्हाप्रमुख पंकज राणे, शिवसेना अनुसूचित जाती-जमाती तालुकाध्यक्ष राजेंद्र वानखेडे, नाना बोदडे, संतोष माळी, कुणाल बोदडे आणि चेतन झनके यांच्यासह मुक्ताईनगरचे नगरसेवक, शिवसेना व युवासेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. याशिवाय समाजबांधव आणि परिसरातील नागरिकांनीही मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.


Protected Content

Play sound