मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शेतजमिनीच्या मोजणी प्रकरणातील त्रुटी (त्रुटी पूर्तता) दूर करून काम करून देण्यासाठी सायबर कॅफे चालकाच्या मध्यस्थीने १,००० रुपयांची लाच मागून ती स्वीकारणाऱ्या भुसावळ भूमि अभिलेख कार्यालयातील शिपायाला व सहआरोपी सायबर कॅफे चालकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडले. ही धडक कारवाई आज, १६ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी जामनेर रोडवरील नेहते हॉस्पिटलजवळ करण्यात आली.
नक्की काय घडले प्रकरण?
तक्रारदार (वय ३६ वर्षे, रा. भुसावळ) यांची मौजे गोजोरे (ता. भुसावळ) शिवारात शेतजमीन आहे. या शेतजमिनीची मोजणी करण्यासाठी त्यांनी ५ सप्टेंबर २०२६ रोजी भुसावळ येथील ‘चव्हाण सायबर कॅफे’मधून ऑनलाइन अर्ज केला होता व २,००० रुपयांचे अधिकृत चलन भरले होते.
त्यानंतर ३० सप्टेंबर रोजी तक्रारदारांना मोजणीच्या प्रकरणात त्रुटी असल्याचा टेक्स्ट मेसेज आला. त्याची चौकशी करण्यासाठी तक्रारदारांनी सायबर कॅफे चालक राकेश रामदास चव्हाण (वय ४३, रा. निवृत्ती नगर, भुसावळ) याच्याशी संपर्क साधला. त्यावेळी राकेश चव्हाण याने भूमि अभिलेख कार्यालयातील शिपाई सचिन किसन पाटील (वय ४५, रा. तापी नगर, भुसावळ) याच्याशी तक्रारदाराचे बोलणे करून दिले. “तुझे काम होऊन जाईल,” असे आश्वासन यावेळी देण्यात आले.
१,००० रुपयांच्या लाचेची मागणी
१६ ऑक्टोबर २०२६ रोजी सायबर कॅफे चालक राकेश चव्हाण याने तक्रारदाराला फोन करून मोजणीतील त्रुटींची पूर्तता करण्यासाठी लोकसेवक सचिन पाटील याच्यासाठी १,००० रुपयांच्या लाचेची मागणी केली.
तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लागलीच लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB), जळगाव येथे धाव घेऊन तक्रार नोंदवली. एसीबीच्या पथकाने त्याच दिवशी पंचांसमक्ष पडताळणी केली असता, लोकसेवक सचिन पाटील याने सायबर कॅफे चालकाच्या मध्यस्थीने १,००० रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.
एसीबीचा यशस्वी सापळा!
पडताळणीनंतर एसीबीच्या पथकाने दुपारी १:३२ वाजेच्या सुमारास जामनेर रोडकडून हनुमान नगरकडे जाणाऱ्या रस्त्यावरील नेहते हॉस्पिटलजवळ सापळा रचला.
तक्रारदाराकडून १,००० रुपयांची लाचेची रक्कम सायबर कॅफे चालक राकेश चव्हाण याने लोकसेवक शिपाई सचिन पाटील याच्याकरिता स्वीकारताच एसीबीच्या पथकाने दोघांना रंगेहात ताब्यात घेतले. या प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
कारवाई करणारे पथक:
ही कारवाई पोलीस अधीक्षक, भारत तांगडे , अप्पर पोलीस अधीक्षक प्रदीप मैराळे, अप्पर पोलीस अधीक्षक कविता फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यवेक्षक अधिकारी पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर ,सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक, हेमंत नागरे यांच्या नेतृत्वखाली पोलीस अंमलदार किशोर महाजन, मनोज पाटील आणि प्रणेश ठाकूर यांच्या पथकाने केली




