जामनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात मालदाभाडी गावाजवळ गुरुवारी दुपारी झालेल्या भीषण रस्ते अपघातात तीन बालकांसह सहा जणांचा मृत्यू झाला. जामनेर ते बोदवड मार्गावर भरधाव ट्रकने दोन दुचाकींना जोरदार धडक दिल्याने हा दुर्दैवी अपघात घडला. या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून, एकाच अपघातात सहा जणांचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, गुरुवारी दुपारी सुमारे तीन वाजेच्या सुमारास मालदाभाडी आणि वाडीकिल्ला गावांदरम्यान हा भीषण अपघात झाला. जामनेरहून बोदवडकडे जाणाऱ्या मार्गावर भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने दोन दुचाकींना जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, दोन्ही दुचाकींवरील सहा जणांचा मृत्यू झाला. या अपघातात दोन पुरुष, एका महिलेसह तीन बालकांचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. एकाच दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे. विशेषतः तीन बालकांचा मृत्यू झाल्याच्या वृत्तामुळे नागरिकांमधून तीव्र दुःख व्यक्त केले जात आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तसेच परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातातील मृतांना तातडीने जामनेर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांकडून पुढील कार्यवाही सुरू करण्यात आली.

दरम्यान, हा अपघात नेमका कशामुळे झाला, ट्रकचा वेग किती होता आणि चालकाचे वाहनावरील नियंत्रण कसे सुटले, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. अपघातातील मृतांची ओळख पटवण्याचे कामही पोलिसांकडून सुरू होते. तपासानंतरच दुर्घटनेमागील नेमकी कारणे स्पष्ट होणार आहेत. जामनेर-बोदवड मार्गावरील मालदाभाडी-वाडीकिल्ला दरम्यान झालेल्या या भीषण अपघाताने रस्ते सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आणला आहे. भरधाव वाहनांमुळे निष्पाप नागरिकांचे जीव धोक्यात येत असल्याच्या पार्श्वभूमीवर या दुर्घटनेमुळे परिसरात शोक आणि चिंता व्यक्त केली जात आहे.



