जळगाव प्रतिनिधी । स्थायी समितीच्या सभेत किरकोळ वसुलीची निवीदा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
महानगरपालिकेची स्थायी समितीची सभा सभापती जितेंद्र मराठे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सभेला आयुक्त चंद्रकांत डांगे, उपायुक्त चंद्रकांत खोसे, प्रभारी नगरसचिव सुभाष मराठे उपस्थित होते. सभेत किरकोळ वसुलीच्या प्रस्तावावरून चर्चा झाली. यात अॅड. शुचिता हाडा यांनी प्रशासनाने हॉकर्सचा सर्व्हे करून नव्याने प्रस्ताव सादर करण्याची सूचना करत प्रस्ताव नामंजूर करण्याचा ठराव मांडला. त्याला भाजपने बहुमताने मंजूर केला. तर माजी महापौर नितीन लढ्ढा यांनी याला विरोध केला. यापूर्वी वसुलीचा आकडा व आताची परिस्थिती यातील तफावत मांडली. पूर्वी १० रुपये पावती असताना ९३ लाखांची वसुली झाली. आता गेल्या वर्षभरापासून २० रुपये वसुली होत असतानाही केवळ ९७ लाखांची वसुली झाली. त्यामुळे १ कोटी ४० लाखांची निविदा मंजूर केल्यास पालिकेचे नुकसान टळेल. जर हा प्रस्ताव रद्द केला व पुन्हा निविदेला प्रतिसाद न मिळाल्यास होणार्या नुकसानीला मतदान करणारे नगरसेवक जबाबदार राहतील, असे ते म्हणाले. तसेच शहरात जागोजागी होर्डिंग लावणार्यांवर तसेच होर्डिंगवर फोटो असणार्या व्यक्तीविरुद्ध थेट गुन्हे दाखल करण्याची मागणी त्यांनी केली.