जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शहरातील कोर्ट चौक ते असोदा रस्त्याचे काँक्रिटीकरण गेल्या सहा महिन्यांपासून रखडल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे. आमदार आणि मक्तेदार यांच्यातील वादामुळे काम बंद पडल्याचा दावा पक्षाने केला असून, पाणीटंचाईचे कारण पुढे करून शहरातील महत्त्वाच्या रस्त्याचे काम थांबविणे चुकीचे असल्याचे म्हटले आहे. रस्त्याचे काँक्रिटीकरण तातडीने पूर्ण करावे, अन्यथा जळगाव महानगरपालिकेसमोर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
जळगाव शहरातील काव्यरत्नावली चौक, आकाशवाणी चौक, स्वातंत्र्य चौक, स्टेडियम चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, नेहरू चौक, टॉवर चौक, महात्मा गांधी मार्केट चौक, भीलपुरा चौक आणि वाल्मिकनगरमार्गे असोदा रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे. यातील काही टप्प्यांचे काम पूर्ण झाले असले, तरी कोर्ट चौक ते असोदा रस्त्यावरील वाल्मिकनगर परिसरापर्यंतचे काम गेल्या सहा महिन्यांपासून बंद असल्याचे पक्षाचे म्हणणे आहे.

या रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळाल्यानंतर रिंगरोडच्या काँक्रिटीकरणालाही मंजुरी देण्यात आली. बुकब्रॉड कॉलनी ते खाजा मिया चौकापर्यंत रस्त्याचे काँक्रिटीकरण पूर्ण झाले असून, उर्वरित बाजूचे काम पाणीटंचाई असतानाही पूर्ण करण्यात येणार असल्याचे आमदार, मंत्री, महानगरपालिका आयुक्त आणि लोकप्रतिनिधींनी जाहीर केल्याचा दावा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. तसेच शिरसोली रस्ता ते मोहाडी रस्त्याचे काम डिसेंबरपर्यंत सुरू करून पूर्ण करण्याबाबतच्या बातम्यांकडेही त्यांनी लक्ष वेधले.
दि. ९ ऑक्टोबर रोजी झालेल्या महानगरपालिकेच्या महासभेत सुमारे २० ते २२ कोटी रुपयांच्या गटार, कन्व्हर्टर, कंपाउंड वॉल आदी कामांना मंजुरी देण्यात आल्याचे पक्षाने नमूद केले. इतर विकासकामांसाठी निधी आणि मंजुरी उपलब्ध होत असताना कोर्ट चौक ते असोदा रस्त्याचे काँक्रिटीकरण पाणीटंचाईचे कारण देऊन रखडविण्यात येणार असल्याची माहिती मिळत असल्याचा दावा पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
कोर्ट चौक ते असोदा हा शहरातील महत्त्वाचा मार्ग असून, या रस्त्याचा वापर नागरिक, विद्यार्थी आणि आसपासच्या ग्रामीण भागातील रहिवासी मोठ्या प्रमाणावर करतात. त्यामुळे रस्त्याचे काम अपूर्ण राहिल्याने नागरिकांना वाहतुकीसंबंधी अडचणींचा सामना करावा लागू शकतो. शहरातील इतर भागांतील रस्त्यांचे काँक्रिटीकरण सुरू असताना या महत्त्वाच्या मार्गाकडे दुर्लक्ष का केले जात आहे, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने उपस्थित केला आहे.
रस्त्याचे काम तातडीने सुरू करून पूर्ण करावे, अशी मागणी पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. नागरिकांच्या दैनंदिन प्रवासाशी संबंधित असलेल्या या प्रश्नाकडे महानगरपालिका प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे आणि विकासकामांमध्ये नागरिकांच्या सोयीला प्राधान्य द्यावे, अशी भूमिका पदाधिकाऱ्यांनी मांडली आहे.
या आंदोलनाचा इशारा महानगर जिल्हाध्यक्ष अशोक लाडवंजारी, कार्याध्यक्ष राजुभा मोरे, डॉ. संग्रामसिंग सूर्यवंशी, जिल्हा कार्यालय सरचिटणीस सुनील माळी, जिल्हा उपाध्यक्ष किरण राजपूत, गणेश पाटील, सुमन बनसोडे, अमोल कोल्हे, माधुरी पाटील, युवक महानगर जिल्हाध्यक्ष विनायक पाटील, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा मंगला पाटील, सरचिटणीस सुहास चौधरी, जिल्हा उपाध्यक्ष ललित नारखेडे, विधानसभा प्रमुख जयप्रकाश महाडिक, विद्यार्थी आघाडीचे महानगर अध्यक्ष गिरीश सांगळे, उपाध्यक्ष अकबर पठाण, अल्पसंख्याक महानगर जिल्हाध्यक्ष रईस खाटीक, विशाल देशमुख, गणेश हटकर आणि गणेश सोनार यांच्यासह इतर पदाधिकारी यांनी दिला आहे.



