Home Cities जळगाव भोकरमध्ये सेवा संकल्प अभियानाचा बँक मेळावा ; ३७ स्वयंसहाय्यता गटांना १ कोटी...

भोकरमध्ये सेवा संकल्प अभियानाचा बँक मेळावा ; ३७ स्वयंसहाय्यता गटांना १ कोटी ७५ लाखांचे कर्जवाटप

0
13

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून जळगाव तालुक्यातील कानळदा-भोकर प्रभागांतर्गत भोकर येथील भारतीय स्टेट बँकेच्या (SBI) शाखेत १३ ऑक्टोबर २०२६ रोजी बँक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यात ३७ स्वयंसहाय्यता गटांना एकूण १ कोटी ७५ लाख ६० हजार रुपयांपर्यंतच्या बँक कर्जाचे वाटप करण्यात आले. या आर्थिक मदतीमुळे महिलांना स्वयंरोजगार सुरू करण्यासाठी आणि स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी प्रोत्साहन मिळणार आहे.

या बँक मेळाव्याला तालुका अभियान व्यवस्थापक रवींद्र सूर्यवंशी, भोकर एसबीआय शाखेचे व्यवस्थापक जयेश राणे, तालुका व्यवस्थापक (BMFI) स्वप्निल सोनार, प्रभाग समन्वयक तुकाराम कोल्हे आणि स्वप्निल पाटील यांची उपस्थिती होती. तसेच भोकर गणातील सर्व ग्रामसखी आणि बँक सखी या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. मेळाव्यात तालुका अभियान व्यवस्थापक रवींद्र सूर्यवंशी यांनी महिलांना बँक कर्जाचा योग्य वापर करून स्वतःचा व्यवसाय किंवा उपजीविकेचे साधन सुरू करण्याबाबत मार्गदर्शन केले. उपलब्ध आर्थिक सुविधांचा लाभ घेऊन महिलांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे, तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती घेऊन त्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. स्वयंसहाय्यता गटांच्या माध्यमातून महिलांना एकत्र येऊन आर्थिक व्यवहार करण्याची, बचतीची सवय विकसित करण्याची आणि व्यवसायासाठी आवश्यक भांडवल उभारण्याची संधी मिळते. या पार्श्वभूमीवर कर्जाचा विनियोग नियोजनबद्ध पद्धतीने करून उत्पन्नवाढीसाठी प्रयत्न करावेत, असे मार्गदर्शनही मेळाव्यात करण्यात आले.

भोकर एसबीआय शाखेचे व्यवस्थापक जयेश राणे यांनी महिलांना विमा योजनांचे महत्त्व समजावून सांगितले. कुटुंबातील सदस्यांचा विमा उतरविल्यामुळे संभाव्य आर्थिक संकटाच्या काळात कुटुंबाला आर्थिक संरक्षण मिळण्यास मदत होऊ शकते, याबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली. स्वयंसहाय्यता गटांतील अधिकाधिक महिलांनी पात्रतेनुसार विमा योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. या मेळाव्याच्या माध्यमातून महिलांना कर्जवाटपाबरोबरच आर्थिक नियोजन, स्वयंरोजगार आणि विमा संरक्षण याबाबत मार्गदर्शन मिळाले. ग्रामीण भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रभाग समन्वयक स्वप्निल पाटील यांनी केले. संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन भोकर येथील बँक सखी आणि ग्रामसखी यांनी केले.


Protected Content

Play sound