पारोळा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील तामसवाडी येथील स्वर्गीय मातोश्री वत्सलाबाई लोटन सोनवणे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ विजय सोनवणे यांनी जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळेतील विद्यार्थिनींना स्पोर्ट्स ड्रेसचे वाटप करून आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे. मातोश्रींच्या स्मृती चिरंतन जपतानाच ग्रामीण भागातील विद्यार्थिनींच्या शैक्षणिक आणि क्रीडाविषयक प्रगतीला प्रोत्साहन देणाऱ्या या स्तुत्य उपक्रमामुळे विद्यार्थिनींच्या चेहऱ्यावर मोठा आनंद फुलला असून, त्यांच्या या दातृत्वाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
तामसवाडी केंद्राच्या शिक्षण परिषदेदरम्यान आयोजित कार्यक्रमात पारोळा तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी दामिनी चौधरी आणि शिक्षण विस्तार अधिकारी विश्वास हरी पाटील यांच्या हस्ते विद्यार्थिनींना स्पोर्ट्स ड्रेसचे वितरण करण्यात आले. यावेळी केंद्रप्रमुख सागर पाटील, शाळा व्यवस्थापन समितीचे शिक्षणतज्ज्ञ मोतीराम त्र्यंबक पाटील यांच्यासह केंद्रांतर्गत विविध शाळांचे मुख्याध्यापक आणि शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थिनींमध्ये संघभावना, शिस्त, एकात्मता आणि सहकार्याची भावना रुजावी, तसेच त्यांनी विविध क्रीडा उपक्रमांमध्ये आत्मविश्वासाने सहभागी व्हावे, या उद्देशाने शाळेच्या ‘हाऊस संकल्पने’नुसार लाल, निळा, पिवळा आणि हिरवा अशा चार रंगांच्या आकर्षक स्पोर्ट्स ड्रेसची निवड करून त्यांचे वाटप करण्यात आले.

खेळामुळे विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच शिस्त, नेतृत्वगुण आणि खिलाडूवृत्ती विकसित होते, त्यामुळे क्रीडा क्षेत्र हे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे महत्त्वाचे माध्यम ठरते. कार्यक्रमादरम्यान बोलताना गटशिक्षणाधिकारी दामिनी चौधरी आणि शिक्षण विस्तार अधिकारी विश्वास हरी पाटील यांनी विजय सोनवणे यांच्या उपक्रमाचे विशेष कौतुक केले. ग्रामीण भागातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या गरजा लक्षात घेऊन समाजातील दानशूर व्यक्तींनी अशा प्रकारे पुढाकार घेतल्यास शैक्षणिक सुविधांना बळ मिळेल आणि विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव मिळेल, असे मत मान्यवर अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.
शाळा ही केवळ शिक्षण देणारी संस्था नसून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण करणारे केंद्र असल्याने समाज आणि शिक्षण विभागाने एकत्रितपणे काम करणे गरजेचे असल्याचे यावेळी सांगण्यात आले. विद्यार्थिनींना हे स्पोर्ट्स ड्रेस उपलब्ध करून देण्यासाठी मुख्याध्यापक निलेश शिंदे, वैशाली नांद्रे, उज्वला पाटील आणि विलास हिरामण रखमे यांनी विशेष परिश्रम घेतले. स्वर्गीय वत्सलाबाई लोटन सोनवणे यांच्या स्मृतींना अशा सामाजिक कार्यातून दिलेला हा उजाळा ग्रामीण भागातील मुलींच्या प्रगतीला हातभार लावणारा आणि समाजासमोर एक प्रेरणादायी आदर्श निर्माण करणारा ठरला आहे.



