यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संचलित यावल येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या वतीने ‘नशामुक्त भारत अभियान’ अत्यंत उत्साहात राबविण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. आर. गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी व युवकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत व्यसनमुक्तीचा संदेश दिला.
कार्यक्रमाच्या वेळी महाविद्यालयाच्या प्रांगणात जमलेल्या सर्व स्वयंसेवकांनी व विद्यार्थ्यांनी एकमुखाने नशामुक्त भारताच्या उभारणीसाठी कटिबद्ध राहण्याची शपथ घेतली. तरुण पिढीला व्यसनाधीनतेपासून दूर ठेवून निरोगी व सशक्त समाज घडवण्याच्या दृष्टीने हे अभियान अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. याप्रसंगी सी. टी. वसावे यांनी उपस्थित स्वयंसेवकांना मार्गदर्शन करताना व्यसनमुक्त जीवन जगण्याचे महत्त्व पटवून दिले. त्यांनी आपल्या मनोगतात स्पष्ट केले की, नशा ही केवळ व्यक्तीचे आयुष्य उद्ध्वस्त करत नाही तर संपूर्ण कुटुंबाला आणि समाजाला दुष्परिणामांना सामोरे जावे लागते, त्यामुळे तरुणांनी जागरूक राहून व्यसनांपासून दूर राहिले पाहिजे. या विशेष उपक्रमाला राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. पी. व्ही. पावरा, प्रा. अर्जुन गाढे, प्रा. नागेश्वर जगताप, प्रा. हेमंत पाटील आणि प्राध्यापिका रुपाली शिरसाठ यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमात एकूण ९७ स्वयंसेवकांनी सक्रिय सहभाग घेऊन अभियानाचे गांभीर्य आणि महत्त्व समजून घेतले.




