Home Cities जळगाव गोदावरी आयएमआरमध्ये ‘फ्रेशर्स स्पॉटलाइट २के२६’; रोशनी सरोदे आणि प्रितेश ठाकूर ठरले ‘फ्रेशर्स’

गोदावरी आयएमआरमध्ये ‘फ्रेशर्स स्पॉटलाइट २के२६’; रोशनी सरोदे आणि प्रितेश ठाकूर ठरले ‘फ्रेशर्स’

0
10

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (आयएमआर), जळगाव येथे बीसीए, एमबीए, एचएचएम आणि एमसीए विभागातील प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित ‘फ्रेशर्स स्पॉटलाईट २के२६’ हा स्वागत समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या कार्यक्रमातून नव्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन जीवनाची ओळख, आपले कलागुण सादर करण्याची संधी आणि व्यक्तिमत्त्व विकासासाठी व्यासपीठ उपलब्ध झाले. विविध स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम आणि मनोरंजक उपक्रमांमुळे कार्यक्रमात रंगत आली. यामध्ये रोशनी सरोदे हिने ‘मिस फ्रेशर’चा, तर प्रितेश ठाकूर याने ‘मिस्टर फ्रेशर’चा बहुमान पटकावला.

कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन आणि दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी संस्थेचे संचालक डॉ. प्रशांत वारके यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर डॉ. वारके यांनी प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना व्यवस्थापन क्षेत्रातील नव्या संधी, करिअरचे नियोजन आणि व्यावसायिक कौशल्यांचे महत्त्व अधोरेखित केले. उच्च शिक्षणाच्या नव्या प्रवासात विद्यार्थ्यांनी केवळ अभ्यासापुरते मर्यादित न राहता सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासावरही भर द्यावा, असे आवाहन त्यांनी केले. तसेच विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि आगामी शैक्षणिक वाटचालीसाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या.

नवीन विद्यार्थ्यांमधील आत्मविश्वास, संवादकौशल्य, सर्जनशीलता आणि व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू समोर आणण्यासाठी ‘फ्रेशर्स स्पॉटलाईट २के२६’ ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत इंट्रोडक्शन, डिबेट, टंग ट्विस्टर आणि जज क्वेश्चन अशा चार फेऱ्यांचा समावेश होता. एकूण १०० गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करण्यात आले. प्रत्येक फेरीत विद्यार्थ्यांनी आपली बुद्धिमत्ता, हजरजबाबीपणा, विचार मांडण्याची क्षमता आणि आत्मविश्वास दाखवला.

स्पर्धेसोबतच विद्यार्थ्यांनी नृत्य, गायन आणि रॅप सादरीकरणासह विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. नव्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांनी उपस्थितांची मने जिंकली. या सादरीकरणांमुळे कार्यक्रमाला सांस्कृतिक रंगत लाभली, तर विद्यार्थ्यांना आपल्या सुप्त कलागुणांना व्यासपीठ मिळाले. महाविद्यालयीन जीवनाची सुरुवात आनंददायी आणि संस्मरणीय करण्याच्या दृष्टीने हा स्वागत समारंभ विद्यार्थ्यांसाठी विशेष ठरला.

स्पर्धेतील विविध फेऱ्यांमधील कामगिरीच्या आधारे रोशनी सरोदे हिने ‘मिस फ्रेशर २के२६’ हा किताब पटकावला, तर प्रितेश ठाकूर याची ‘मिस्टर फ्रेशर २के२६’ म्हणून निवड झाली. या यशामुळे दोन्ही विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देवयानी महाजन हिने प्रभावीपणे केले.


Protected Content

Play sound