Home आरोग्य जागतिक संधिवात दिनानिमित्त जळगावात विशेष व्यायाम सत्र

जागतिक संधिवात दिनानिमित्त जळगावात विशेष व्यायाम सत्र

0
11

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जागतिक संधिवात दिन २०२६ निमित्त डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, जळगाव येथील मस्क्युलोस्केलेटल फिजिओथेरपी विभागातर्फे १२ ऑक्टोबर रोजी विशेष व्यायाम सत्राचे आयोजन करण्यात आले. डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील फिजिओथेरपी ओपीडीमध्ये आयोजित या उपक्रमातून संधिवाताच्या रुग्णांसाठी नियमित व्यायाम, शारीरिक हालचाली आणि फिजिओथेरपीचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.

या विशेष व्यायाम सत्राचे संचालन डॉ. सोनिया बेनाङे, डॉ. तेजल सोनवणे आणि डॉ. सेजल कुकरेजा यांनी केले. या उपक्रमात एकूण १० प्रौढ व्यक्तींनी सहभाग नोंदविला. फिजिओथेरपिस्टच्या मार्गदर्शनाखाली सहभागी व्यक्तींकडून विविध प्रकारचे व्यायाम करून घेण्यात आले. तसेच संधिवातामुळे उद्भवणाऱ्या शारीरिक समस्यांवर नियंत्रण मिळविण्यासाठी योग्य व्यायाम पद्धतींची माहिती देण्यात आली. संधिवाताच्या व्यवस्थापनामध्ये नियमित शारीरिक हालचाली आणि उपचारात्मक व्यायाम महत्त्वाची भूमिका बजावतात. सांध्यांमध्ये होणाऱ्या वेदना, आखडलेपणा आणि हालचालींमधील अडथळे कमी करण्यासाठी योग्य व्यायामाची मदत होऊ शकते. यासोबतच सांध्यांची हालचाल टिकवून ठेवणे, शारीरिक कार्यक्षमता सुधारणे आणि दैनंदिन कामे अधिक सहजतेने करता यावीत, यासाठी सहभागी व्यक्तींना मार्गदर्शन करण्यात आले.

या सत्रादरम्यान निरोगी जीवनशैलीचा अवलंब, नियमित व्यायाम आणि आरोग्याची योग्य काळजी घेण्यावर विशेष भर देण्यात आला. वाढत्या वयात किंवा सांध्यांच्या समस्यांमुळे पडण्याचा धोका टाळण्यासाठी आवश्यक खबरदारी घेणे, वेळोवेळी आरोग्य तपासणी करणे आणि तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार व्यायाम करणे याबाबतही माहिती देण्यात आली. व्यायाम करताना सुरक्षित पद्धतींचा अवलंब केल्यास शारीरिक क्षमता टिकवून ठेवण्यास आणि जीवनमान सुधारण्यास मदत होते, हे यावेळी स्पष्ट करण्यात आले. संधिवातासारख्या आजारांमध्ये केवळ औषधोपचारच नव्हे, तर नियमित शारीरिक हालचाली, योग्य व्यायाम आणि जीवनशैलीतील आवश्यक बदल यांनाही महत्त्व आहे. फिजिओथेरपीच्या माध्यमातून सांध्यांची कार्यक्षमता टिकविणे, हालचाली सुलभ करणे आणि व्यक्तींना दैनंदिन जीवनात अधिक स्वावलंबी बनविण्यासाठी मदत मिळू शकते. याच उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमातून सहभागी व्यक्तींमध्ये सांध्यांच्या आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सहभागी व्यक्ती, प्राध्यापकवर्ग आणि सहकार्य करणाऱ्या सर्वांचे मस्क्युलोस्केलेटल फिजिओथेरपी विभागातर्फे आभार व्यक्त करण्यात आले.


Protected Content

Play sound